

कोल्हापूर : पिण्याच्या पाईपलाईनमध्ये चक्क पोत्याचे तुकडे सापडल्याचा प्रकार बुधवारी न्यू शाहूपुरी येथे समोर आला. पाण्याची तक्रार असल्याने नळ कनेक्शनधारकाने प्लंबरला बोलावून पाईपलाईन काढून तपासणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला.
महापालिकेच्या वतीने शहरासह उपनगरात पाणीपुरवठा केला जातो. थेट काळम्मावाडी धरणातून पाणी शहरात आणले आहे. परंतु, पाण्याची समस्या काही सुटलेली नाही. महिन्यात दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा खंडित होतो. याचबरोबर अंतर्गत वितरण व्यवस्थेमध्येही मोठा घोळ आहे. त्यामुळे गळती लागून पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. न्यू शाहूपुरीतील एका ठिकाणी पुरेसे पाणी येत नसल्याची तसेच पाण्याला घाण वास येत असल्याचे आढळून आले. त्यांनी प्लंबरला बोलावून घेतले. यावेळी त्याने पिण्याची पाईपलाईन काढून तपासली असता त्यातून चक्क धान्याच्या पोत्याचे तुकडे बाहेर आले. मागील वर्षी कळंबा फिल्टर हाऊस ते हॉकी स्टेडियम येथील पाईपलाईन खोदल्यानंतर पाईपलाईनमधून भांडी आढळली होती. यानंतर आता पोत्याची तुकडी आल्याचा प्रकार घडला आहे.