

सुनील कदम
कोल्हापूर : कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि सांगली-कोल्हापुरातील महापूर यांचा परस्पर संबंध अभ्यासून त्याबाबतचा अहवाल देण्यासाठी रूरकी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, या समितीचा अहवाल एक ‘गौडबंगाल’ बनू लागले आहे. कारण महापुरासाठी सुरुवातीला अलमट्टीकडे अंगुलीनिर्देश करणारी ही समिती आता महापुराबाबत अलमट्टीला ‘क्लीन चिट’ देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराच्या कारणांचा सखोल तांत्रिक अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 19 एप्रिल 2022 रोजी उतराखंड येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी, रूरकी या संस्थेला कळविले होते. त्यानुसार या संस्थेने डॉ. ए. के. लोहानी, डॉ. आर. व्ही. काळे आणि अभियंता जे. के. पात्रा यांचा एक अभ्यासगट महाराष्ट्रात पाठविला होता. या अभ्यास गटातील सदस्यांनी 1 जून ते 5 जून 2023 दरम्यान सांगलीपासून अलमट्टीपर्यंतच्या कृष्णा नदीपात्राची पाहणी केली होती. तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे या समितीने काही प्राथमिक निष्कर्ष काढले होते.
त्यानुसार कर्नाटक हद्दीतील जुगूळ-खिद्रापूर पूल, चंदूर-टाकळी पूल, कल्लोळी बंधारा व पुलामुळे कृष्णा नदीच्या मुख्य प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता दर्शविली होती. 2019 सालातील महापुराच्यावेळी कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद होते. याचा कोल्हापुरातील महापुरावर परिणाम झाल्याची बाबही या अभ्यासगटाने अधोरेखित केलेली होती. मात्र, महापूर आणि अलमट्टी यांचा परस्पर अभ्यास करण्यासाठी अजूनही बर्याच तांत्रिक बाबींची माहिती आणि अभ्यास आवश्यक असल्याचे या अभ्यासगटाचे मत होते त्यानुसार गेली दोन वर्षे या समितीचा ‘अभ्यास’ सुरू होता. मात्र, अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यातच या अभ्यासगटाने महापूर आणि अलमट्टी यांच्या परस्पर संबंधाकडे अंगुलीनिर्देश केल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते.
आता महापूर आणि अलमट्टीच्या परस्पर संबंधाबाबत या समितीची मते बदलल्याचे निदर्शनास येत आहे. काही दिवसांपूर्वी जलसंपदा विभागातील काही अधिकार्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे रूरकी समितीच्या सदस्यांशी अंतिम अहवालाबाबत संपर्क साधला होता. त्यावेळी बोलताना समितीच्या सदस्यांनी ‘अलमट्टी धरण 519 मीटरने भरले की अलमट्टी आणि हिप्परगी या दोन धरणांच्या मध्ये पाण्याचा फुगवटा तयार होऊन मागून येणारे पाणी पुढे जायला अडथळा तयार होतो. परिणामी, हिप्परगी धरणातील पाणीही पुढे सरकायला अडथळा तयार होतो आणि हिप्परगी धरणातील हे पाणी पाठीमागच्या बाजूस (म्हणजेच सांगली-कोल्हापूरच्या दिशेने) सरकायला सुरुवात होते,’ असे कबूल केले होते. समितीच्या सदस्यांचे हे म्हणणे म्हणजे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराला अलमट्टी आणि हिप्परगी धरणाचे बॅकवॉटरच कारणीभूत ठरत असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच होती.
समितीचे सदस्य अलमट्टी धरणाची उंची 524 मीटर झाल्यास काय होईल, त्याचा म्हणे फेरआढावा घेत आहेत. समिती सदस्यांनी पूर्वीची भूमिका बदलून अलमट्टीला ‘क्लीन चिट’ देण्याची ‘सिद्धता’ केल्याचे वारंवार जाणवत होते, असे जलसंपदाच्या काही वरिष्ठ अधिकार्यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. त्यावरून समितीचा अंतिम अहवाल काय असेल, त्याचा अंदाज येत आहे.
19 एप्रिल 2022 रोजी रूरकी समिती नियुक्त झाली. जून 2023 मध्ये या समितीच्या सदस्यांनी महापूरग्रस्त क्षेत्राची पार अलमट्टीपर्यंत पाहणी केली. त्यानंतर लगेचच ऑगस्ट 2023 मध्ये आपला अंतरिम अहवाल देऊन महापूर आणि अलमट्टीचा परस्पर संबंध काहीसा अधोरेखित केला. समिती आपला अंतिम अहवाल डिसेंबर 2023 मध्ये देणार होती. पण त्यानंतर जवळपास दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी वारंवार मागणी करूनही रूरकी समितीने आपला अंतिम अहवाल अजूनही दिलेला नाही. उलट गेल्या काही दिवसांपासून या समितीच्या सदस्यांची मते ‘अलमट्टीधार्जिण’ होताना दिसत आहेत. त्यामुळे रूरकी समितीला ‘अलमट्टीच्या कुणा लाभार्थ्यांनी मॅनेज’ केले की काय, अशी शंका उपस्थित होताना दिसत आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.