

कोल्हापूर : पाचवी व आठवीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुन्हा शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. यंदा देखील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे निकाल अधिक उजवे ठरले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी राज्य गुणवता यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. सध्या ‘ग्रामीण भागातील गुणवत्ता न्यारी, शिष्यवृत्तीत गरिबांची पोरं भारी’ असे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्य सरकारकडून दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शासनातर्फे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी उच्च गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. अभ्यासासाठी मर्यादित साधने असूनही या विद्यार्थ्यांनी अथक मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड (145), राधानगरी (134), हातकणंगले (131), कागल (116), गडहिंग्लज (104) तालुक्यांतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
राज्य गुणवत्ता यादीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपैकी 19 टक्के विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात राज्य गुणवत्ता यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील 27 पैकी 24 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतील असून त्यांनी यशाची पताका फडकवली आहे. ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्यांमुळे गावकुसाबाहेरही गुणवत्ता आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊन हे विद्यार्थी भविष्यात निश्चितच मोठ्या शैक्षणिक संधी साध्य करतील, असा विश्वास शिक्षक, पालकांनी व्यक्त केला आहे. महापालिका, झेडपी शाळेत प्रवेशासाठी काही वर्षांपूर्वी नाके मुरडली जात होती आता हे चित्र बदलले आहे. ग्रामीण भागातील मुलांनी मिळवलेल्या यशाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल राहिला असून यश मिळवणारी मुले ग्रामीण तसेच दुर्गम भागातील आहेत. त्यामुळे या यशाचा आनंद मोठा आहे, अशी भावना काही शिक्षकांनी व्यक्त केली.