

कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व राजेशाहीतसुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेकांचा विरोध झुगारून लोकशाही मूल्यांची जपणूक केली. त्यांच्या विचारधारेत भारतीय व पाश्चात्त्य संस्कृतीचा सुरेख संगम दिसतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात समतेच्या माध्यमातून शाहूंचे विचार उतरवले. आजचे अधिकारी आणि राज्यकर्त्यांनी समाजातील तळागाळातील प्रश्न सोडवायचे असतील, तर त्यांना माणुसकी आणि शाहूंचे विचार समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य व चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केले.
राजर्षी शाहू जयंतीचे औचित्य साधून शाहू स्मारक भवनात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात खासदार शाहू महाराज व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते डॉ. पटेल यांना ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व एक लाख रुपये असे होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, रोहित तोंदले आदी मान्यवर उपस्थित होते.
आजवर अनेक पुरस्कार मिळाले, पण हा पुरस्कार मनाला स्पर्शून गेला आहे, असे सांगत डॉ. पटेल म्हणाले, शाहू महाराजांनी लोकशाही नसतानाही मानवी मूल्ये जपली. त्यांनी केवळ सत्ता वापरली नाही, तर समाजाच्या तळागाळातील लोकांशी नाते जोडले. 50 टक्के आरक्षणाचा कायदा करून त्यांनी विरोध धुडकावून ऐतिहासिक निर्णय घेतला. प्रत्येक समाजासाठी वसतिगृहे निर्माण केली. शाहूंनी शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी दीनदलित, सामान्य माणसांसाठी एवढी सामाजिक कामे केली ती आजही समाजात प्रतिबिंबित आहेत. रेल्वेसह इतर अनेक सुविधा त्यांनी कोल्हापुरात केल्या.
यावेळी डॉ. पटेल यांनी राजर्षी शाहूंविषयी एक किस्सा सांगत सभागृहात हशा पिकवला. शाहू महाराजांनी आरक्षणाचा निर्णय घेतला होता. पण त्यास विरोध होऊन फाईल गहाळ झाली. त्यांनी एका पंत नावाच्या अधिकार्याला चहासाठी बोलावले. दरम्यान, दरबारातील एक वाघाचे लहानसे पिल्लू त्या अधिकार्याजवळ गेले. अधिकार्याला वाटले, मांजराचे पिल्लू असेल. तेवढ्यात शाहू महाराज यांनी हे वाघाचे पिल्लू आहे, असे सांगत आत निघून गेले. यामुळे अधिकारी पंत यांना दरदरून घाम फुटला. शाहू महाराजांनी हे आतून पाहिले. नंतर ते बाहेर आले आणि ‘आपण कुठल्या विषयावर बोलत होतो?’ असे पंतांना विचारले. पंत म्हणाले, ‘महाराज, आरक्षणाच्या फाईलवर सही झाली!’ आजही काम करवून घ्यायचे असेल तर वाघाची पिल्लं बाळगावी लागतील, असे सांगत त्यांनी सध्याच्या राज्यकर्त्यांवरही मिश्कील टोला लगावला.
कोल्हापूरबाबतच्या जुन्या आठवणींनाही डॉ. पटेल यांनी उजाळा दिला. माझ्या पहिल्या सिनेमाचे शूटिंग कोल्हापुरात झाले. म्हादबा मेस्त्री यांनी कॅमेरा लावताना मला ‘डॉक्टर, तू नव्या पद्धतीने सिनेमा करतोस, तसंच कर’, असा प्रेमळ सल्ला दिला. त्यांनी चुना, कात लावलेले सुपारीचे पान दिले. मी पान खात नाही म्हटल्यावर म्हणाले, ‘कोल्हापूर आहे, खावेच लागेल!’ कोल्हापूरचे हे प्रेम मी कधी विसरणार नाही, असे त्यांनी भावुक होत सांगितले.
डॉ. पटेल यांनी पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कम प्रकाश आमटे यांच्या ‘आनंदवन’ व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला प्रत्येकी 50 हजार रुपये अशी देणगी म्हणून जाहीर केली.
डॉ. अशोक चौसाळकर यांनी डॉ. पटेल यांचा परिचय करून देऊन सूत्रसंचालन केले. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहीनी चव्हाण यांनी स्वागत केले तर प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे यांनी आभार मानले.