Kolhapur Chitranagari | कोल्हापूर चित्रनगरीत नियमांना हरताळ; ऐतिहासिक वाड्यात खासगी विवाह सोहळा

सांस्कृतिक क्षेत्रातून संताप; मंत्री शेलार दखल घेणार का?
Kolhapur Chitranagari |
कोल्हापूर : चित्रनगरीमध्ये असलेल्या याच वाड्यात नियमाला डावलून सोमवारी खासगी विवाह सोहळा पार पडला.
Published on
Updated on

कोल्हापूर : चित्रपट, मालिका आणि जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी राखीव असलेल्या कोल्हापूर चित्रनगरीत नियमांचे उल्लंघन करून एक खासगी विवाह सोहळा पार पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी चित्रनगरीतील ऐतिहासिक वाड्याच्या वास्तूत हा विवाह सोहळा झाला. चित्रनगरीतील लोकेशन्स आणि इमारतींचा वापर केवळ चित्रीकरणासाठीच करणे बंधनकारक असताना, एका महिला अधिकार्‍याने आपल्या निकटवर्तीयाच्या लग्नासाठी या वास्तूचा गैरवापर केल्याने सांस्कृतिक क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत असून, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार याची दखल घेऊन कारवाई करणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.

सांस्कृतिक विभागात कार्यरत असलेल्या एका महिला अधिकार्‍याने आपल्या भाच्याच्या लग्नासाठी या वाड्याची वास्तू भाड्याने घेतली होती. विशेष म्हणजे, यासंदर्भात सांस्कृतिक मंत्रालयाशी कोणताही अधिकृत पत्रव्यवहार किंवा परवानगीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. नियमानुसार चित्रनगरीत वैयक्तिक कार्यक्रमांना सक्त मनाई असतानाही, या महिला अधिकार्‍याने पदाचा गैरवापर करून नियमांना धाब्यावर बसवले.

या घटनेमुळे कलाकार आणि तंत्रज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण असून, अशा प्रकारच्या चुकीच्या पायंड्यामुळे चित्रनगरीच्या मूळ उद्देशाला धक्का लागण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित महिला अधिकार्‍याशी केवळ तोंडी चर्चा झाली होती; मात्र कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. सध्या खासगी कार्यक्रमांसाठी चित्रीकरणाची जागा भाड्याने देण्याची कोणतीही परवानगी नाही, असे चित्रनगरीचे व्यवस्थापक दिलीप भांदिगरे यांनी सांगितले.

म्हणे, चित्रनगरीच्या भविष्यासाठी!

चित्रनगरीतील लोकेशन्स म्हणून उभारलेल्या इमारती भविष्यात भाडेतत्त्वावर देण्यासाठी हा लग्न सोहळा प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे. मात्र, सध्या अशी कोणतीही तरतूद नसताना इमारतीचा गैरवापर केला आहे. चित्रनगरीच्या आर्थिक भविष्याचे कारण देणार्‍या महिला अधिकार्‍याने चित्रनगरीतील वाड्यात नियमबाह्य लग्नाचा थाट मांडला.

नियमांना हरताळ : चित्रपट चित्रीकरणासाठी राखीव असलेल्या कोल्हापूर चित्रनगरीतील ऐतिहासिक वाड्यात नियमबाह्य खासगी विवाह सोहळ्याचा थाट.

अधिकार्‍याचा मनमानी कारभार : सांस्कृतिक विभागातील महिला अधिकार्‍याने भाच्याच्या लग्नासाठी अधिकृत परवानगी न घेताच पदाचा गैरवापर केल्याचा आरोप.

प्रशासनाचे अजब समर्थन : चित्रनगरीच्या उत्पन्नाचे कारण पुढे करत ‘प्रायोगिक तत्त्वावर’ लग्न सोहळा केल्याचे स्पष्टीकरण देत प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न.

कलाकारांमध्ये संताप : चित्रीकरण स्थळांचा वापर वैयक्तिक समारंभांसाठी होऊ लागल्याने चुकीचा पायंडा पडण्याची भीती; दोषींवर कठोर कारवाईची मागणी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news