

डॅनियल काळे
कोल्हापूर : शहरातील कोणताही रस्ता अतिक्रमणमुक्त राहिलेला नाही. रस्त्यावर दिसली थोडीशी मोकळी जागा की हातगाड्या, टपर्या, केबिन्स उभ्या राहतात आणि थेट व्यवसाय सुरू होतो. विशेषतः ताराबाई पार्क, नागाळा पार्क या उच्चभ्रू वस्त्यांमध्येही हीच स्थिती असून रहिवाशांना रोजच्या रोज वैताग येत आहे.
आरटीओ कार्यालयापासून महावितरण कार्यालयापर्यंतच्या मार्गावर पूर्वी मोजक्याच टपर्या होत्या. मात्र आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी केबिन्स आणि हातगाड्यांचा अक्षरशः बाजार भरतो. सकाळपासून रात्रीपर्यंत येथे खाण्याच्या टपर्यांवर ग्राहकांची गर्दी असते. महापालिकेकडून काही केबिनधारकांना अधिकृत परवाने दिले असले तरी उर्वरित फेरीवाले अनधिकृतपणेच व्यवसाय करत आहेत. त्यामुळे रस्त्यांची चौथी बाजू व्यापली गेली आहे.
ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयासमोर चार बाय चारच्या केबिनचा परवाना असलेली एक व्यक्ती रस्त्यावरच चायनीज पदार्थ विकणारे मोठे हॉटेल थाटून बसली आहे. गेली अनेक वर्षे हे हॉटेल रात्रीच्या वेळी चालते. वास्तविक एवढ्या मोठ्या स्वरूपातील व्यवसायास परवानगी कशी दिली गेली, हा प्रश्न अनेकदा सभागृहातही उपस्थित झाला होता. मात्र कारवाई न झाल्याने आज हा संपूर्ण रस्ता फेरीवाल्यांच्या घशात गेला आहे.
ताराबाई पार्क, न्यू शाहूपुरी भागात अतिक्रमण इतके वाढले आहे की, पादचार्यांना चालण्यासाठी फूटपाथसुद्धा शिल्लक राहिलेले नाहीत. वाहनधारक, शासकीय कार्यालयात जाणारे नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना दररोज वाहतूक कोंडी, ध्वनी व पर्यावरण प्रदूषणाचा सामना करावा लागतो.
महापालिकेच्या अतिक्रमण पथकाचा धाकच उरलेला नाही. त्यामुळे अनधिकृत फेरीवाले मोकाट सुटले आहेत. आता सामान्य नागरिकांमध्येही प्रश्न उपस्थित होतोय.
* रस्त्यावरच थाटले हॉटेल, फूटपाथ केले गायब!
* पादचार्यांना जाण्यास जागाच नाही, रहिवासीही त्रस्त
* अनधिकृत गाड्यांना कारवाईचा धसकाच नाही
* अतिक्रमण झपाट्याने वाढतंय; कोण रोखणार?
* दररोज वाढणार्या गाड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करतंय
* ताराबाई पार्क, नागाळा पार्कचा रस्त्यावर बाजार