

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील अंतर्गत रस्त्यांसाठी काढण्यात आलेली साडेसहा कोटी रुपयांची निविदा वादाच्या भोवर्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ई-निविदा प्रक्रियेसाठी शासनाने घालून दिलेल्या निकषांनुसार जिल्ह्यातील सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना, हे निकष डावलल्याची चर्चा सध्या बाजार समितीच्या वर्तुळात सुरू आहे.
बाजार समितीमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, अडते, व्यापारी व शेतकर्यांकडून दर्जेदार रस्त्यांची मागणी होत आहे. दररोज लाखो रुपयांचा सेस संकलित केला जात असतानाही आवश्यक सोयी-सुविधा दिल्या जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. वर्षभरापूर्वी साडेतीन कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली आहेत. त्यामध्ये सुमारे निम्मे रस्ते डांबरीकरणाचे तर उर्वरित सिमेंट काँक्रिटचे केले आहेत.
आता पुन्हा बाजार समिती आवारातील सुमारे दहा किलोमीटरच्या रस्त्यांसाठी साडेसहा कोटी रुपयांची नवीन निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती गेल्या आठवड्यात झालेल्या अडते, व्यापारी व शेतकर्यांच्या बैठकीत प्रशासनाने दिली. मात्र, ही निविदा नेमकी कधी व कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली, हे अनेकांना माहिती नाही. याबाबत बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दळवी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
नवीन प्रस्तावित कामांपैकी सुमारे 70 टक्के रस्ते डांबरीकरणाचे तर 30 टक्के सिमेंट काँक्रिटचे असणार असल्याचे सांगितले जाते. खरेदी विभाग, वे-बि—ज ते गूळ लाईन, फळ-भाजीपाला विभाग आदी भागांतील रस्त्यांचा यात समावेश आहे. मात्र, शासनाच्या नियमानुसार आवश्यक असलेले प्रसिद्धीचे निकष संचालक मंडळाने पाळले नसल्याचा आरोप होत आहे. तसेच बाजार समिती स्वनिधीतून हे रस्ते करणार आहे. त्यासाठी ठेवी मोडून निधीची तरतूद केली जाणार असल्याची चर्चा बाजार समितीत सुरू आहे.
ई-निविदा सादर करण्याचा आज अखेरचा दिवस
सोमवारी ई-निविदा सादर करण्याचा अखेरचा दिवस आहे. बुधवारी निविदा उघडण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया वादग्रस्त ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.