

कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या पर्यावरणीय संवर्धनासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासोबतच जलक्षेत्र व पाणलोट क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी ‘पुनरुत्थान, पुनर्स्थापना व पुनरुज्जीवन’ (आरआरआर) या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रस्तावित आहे.
प्रस्तावानुसार, ‘आरआरआर’ प्रक्रियेची सुरुवात तलावाच्या जलस्रोताचा सविस्तर अभ्यास आणि स्थळ पाहणी करून केली जाणार आहे. त्यानंतर संशोधन पथकाकडून उपचारांसाठी आवश्यक वनस्पतीजन्य अर्क तयार केला जाईल. हा अर्क १०० टक्के वनस्पतीजन्य घटकांपासून तयार करण्यात येणार असून स्थानिक कृषी-हवामान क्षेत्रातील निवडक वनस्पतींचा त्यासाठी वापर केला जाणार आहे.
तयार करण्यात आलेला द्रवरूप संकेंद्रित अर्क त्याच कृषी-हवामान क्षेत्रातील ताज्या पिण्यायोग्य पाण्यात विरघळून सूर्योदयाच्या वेळी तलावात सोडला जाणार आहे. सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत हे द्रावण जलपरिसंस्थेत कार्यान्वित होऊन तलावातील नैसर्गिक प्रक्रियांना चालना देईल, अशी या तंत्रज्ञानामागील संकल्पना आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या पुनरुत्थान टप्प्यात दररोज डोसिंग करण्याचे प्रस्तावित आहे.
रासायनिक हस्तक्षेपाऐवजी जैविक व्यवस्थापन
‘काऊनॉमिक्स’ तंत्रज्ञानामध्ये जलस्रोतामध्ये थेट रासायनिक अथवा भौतिक हस्तक्षेप करण्याऐवजी स्थानिक जलपरिसंस्थेचे पुनरुज्जीवन करून प्रदूषणाचे जैविक पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. दस्तावेजानुसार, जलस्रोत आणि पाणथळ परिसंस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी ही शाश्वत पद्धत आहे.