

देवाळे : भोगावती महाविद्यालयाजवळ अल्पवयीन मुलाच्या बेदरकार स्टंटबाजीने झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळे हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर संतप्त झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि गवई गटाने महाविद्यालय प्रशासनाला सोमवारी धारेवर धरले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना त्यांच्या केबिनमध्ये कोंडून घातले. तीव्र आंदोलनानंतर अखेर महाविद्यालय प्रशासनाने प्रज्ञाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आणि जखमींना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.
बुधवारी सकाळी महाविद्यालयाजवळ एका अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे मोटार चालवत स्टंटबाजी केल्याने मोटार थेट विद्यार्थिनींच्या घोळक्यात घुसली. या अपघातात प्रज्ञा कांबळे हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या चार मैत्रिणी गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सोमवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे यांना निवेदन सादर केले. यावेळी, काही वर्षांपूर्वीही अशाच अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता, तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, असा आरोप उत्तम कांबळे यांनी केला. विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर तडजोड नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.
दरम्यान, प्राचार्यांनी मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करताच, संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना केबिनमध्येच रोखून धरत तीव्र घोषणाबाजी केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर संस्थेचे अध्यक्ष मेडसिंगे आणि संचालक मंडळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून प्रज्ञाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी आणि जखमींना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाशीकर आणि जिल्हा संघटक राजेंद्र ठिकपुर्लीकर यांनी दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांनीही या घटनेचा निषेध करत मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे आणि जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला निवेदन देऊन हुल्लडबाज मुलावर कठोर कारवाई करण्याची आणि पीडित विद्यार्थिनींना न्याय देण्याची मागणी केली.
अपघातास जबाबदार अल्पवयीन चालक आणि त्याच्या पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
मृत प्रज्ञा कांबळेच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये आणि जखमी विद्यार्थिनींना प्रत्येकी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
प्रज्ञाच्या कुटुंबातील एका सदस्याला संस्थेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी.
महाविद्यालय परिसरात वाहतूक नियंत्रक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि बस थांबा आवारातच स्थलांतरित करावा.