

उजळाईवाडी : रविवारी सर्वत्र ‘फादर्स डे’ साजरा होत असताना पिता-पुत्राच्या जाण्याने उजळाईवाडीवर मात्र शोककळा पसरली. कुंडमळा (ता. मावळ, जि. पुणे) येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत मूळचे उजळाईवाडीचे रहिवासी असलेल्या रोहित सुधीर माने (वय 32) आणि त्यांचा मुलगा विहान (वय 6) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांची पत्नी शमिका गंभीर जखमी झाली आहे. सोमवारी या दोघा मायलेकांवर चिंचवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रोहित पत्नी शमिका आणि मुलगा विहान यांच्यासह कुंडमळा येथे पर्यटनासाठी गेले होते. अन्य पर्यटकांसमवेत इंद्रायणी नदीवरील लोखंडी पुलावर हे तिघेजण असताना पूल कोसळला, त्यात रोहित आणि विहान पाण्यातून वाहून गेले. पुलावरून इंद्रायणीचे सौंदर्य अनुभवण्यासाठी गेलेल्या रोहित आणि विहानचा त्या सौंदर्याचा अनुभव अखेरचा ठरला. पाण्याच्या प्रवाहात रोहितची सगळी स्वप्नं आणि विहानचे कोवळे बालपण वाहून गेले.
रोहित मूळचे उजळाईवाडीचे. वडिलांचे गावातच चाळीस वर्षांपासून मेडिकलचे दुकान. मात्र, याच व्यवसायात न गुंतून राहता, रोहितने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तवनापा पाटणे हायस्कूलमध्ये तर अशोकराव माने पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पुणे गाठले. तिथेच तो स्थायिक झाला. पुण्यातील शमिका यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विहानच्या जन्मानंतर त्या दोघांचं जीवन अधिकच सुंदर बनले होते; पण नियतीला काही वेगळंच मान्य होते. ‘फादर्स डे’च्या दिवशी, हसत्या खेळत्या बाप-लेकांचे जीवन एकाच क्षणात संपलं. त्यांच्या मागे पत्नी शमिका, आई-वडील व विवाहित बहीण असे कुटुंब आहे. घटनेची माहिती मिळताच आई-वडिलांसह नातेवाईकांनी रविवारी रात्रीच पुणे गाठले होते. आज रोहित आणि विहानवर चिंचवड, पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.