kolhapur Crime News | पिस्तूलच्या धाकाने 10.35 लाख लुटले

स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष
kolhapur Crime News |
crime newsPudhari
Published on
Updated on

कुरुंदवाड : स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील दोन युवकांना दि. 15 मे रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास टाकळीवाडी (ता. शिरोळ) दरम्यानच्या मंदिराच्या परिसरात बोलावून त्यांच्याकडील तब्बल 10 लाख 35 हजार 200 रुपयांची रोकड पिस्तूलचा धाक दाखवत लुटल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी भीमाशंकर मल्लेश पाटील (वय 36, रा. बेळुंडी, ता. जत, जि. सांगली) यांनी गुरुवारी रात्री फिर्याद दिल्याने चार अनोळखी पुरुष आणि दोन महिलांविरोधात कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करून शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

फिर्यादी भीमाशंकर पाटील यांचा मागील आठवड्यात एका अनोळखी महिलेशी संपर्क झाला होता. संबंधित महिलेने बाजारभावापेक्षा कमी दरात, 80 हजार रुपये तोळा दराने सोने देण्याचे आमिष दाखवले होते. व्यवहार रोख रकमेने करण्याचे ठरल्याने फिर्यादींना मोठी रक्कम घेऊन येण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार भीमाशंकर पाटील व त्यांचा मित्र दुष्यंत भोसले हे कारमधून 10 लाख 35 हजार 200 रुपयांची रोकड घेऊन दि. 15 रोजी कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गावरील बाळूमामा मंदिराजवळील डांबरी रस्त्यावर पोहोचले असता अचानक चार अनोळखी पुरुष व दोन महिला तेथे आल्या. यातील दोघांच्या हातात पिस्तूल होते. पाटील व त्यांच्या मित्राला पिस्तूलचा धाक दाखवत धमकावले. त्यानंतर त्यांच्या वाहनाची झडती घेत कारमधील रोकड असलेली बॅग हिसकावून पलायन केले. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि संशयितांच्या हालचालींचा तपास गतिमान केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news