

पेठवडगाव : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या प्र-कुलपतिपदी विश्वस्त ऋतुराज पाटील यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय पाटील यांनी तळसंदे येथे विद्यापीठाच्या तिसर्या दीक्षांत समारंभात केली.
अध्यक्षीय भाषण करताना डॉ. संजय पाटील म्हणाले, विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी 2017 पासून डी. वाय. एज्युकेशन संस्थेत झोकून देऊन काम केले आणि त्याच मेहनतीमुळे विद्यापीठाचे स्वप्न साकार झाले. तीन वर्षांत विद्यापीठाचे नाव देश-विदेशात पोहोचले. त्यांचे योगदान आणि निष्ठा पाहता, प्र. कुलपती जबाबदारी त्यांच्यावर देत आहोत. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांनी देखील उपस्थित राहून अभिनंदन केले. आई वैजयंती पाटील, संजय किर्लोस्कर, वृषाली पृथ्वीराज पाटील, पूजा पाटील, देवश्री पाटील, तेजस पाटील, डॉ. अनिलकुमार गुप्ता, डॉ. जे. ए. खोत, विलास शिंदे, भावित नाईक यांनी यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ऋतुराज पाटील आभार व्यक्त करताना म्हणाले, सन 2017 पासून एज्युकेशन संस्थेचा कार्यभार सांभाळत आहे. प्र.कुलपती पदामुळे जबाबदारी अधिक वाढली आहे; पण मी निश्चितच या पदाला साजेसे कार्य करणार आहे. 29 व्या वर्षी यशस्वीपणे आमदारपद सांभाळल्यानंतर आता 36 व्या वर्षी देशातील सर्वात कमी वयाच्या व्यक्तीला प्र. कुलपती पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी फक्त माझ्या कार्यक्षमतेवर अवलंबून नाही तर संपूर्ण टीम, विद्यार्थी, शिक्षक आणि कुटुंबीयांच्या विश्वास आणि सहकार्यामुळे यशस्वी होईल, असेही त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या भविष्यातील उज्ज्वल वाटा घडवण्यासाठी, हे पाऊल केवळ आरंभ आहे. या जबाबदारीतून प्रेरणा घेऊन, विद्यार्थी आणि शिक्षण संस्थेला उच्च शिखरावर नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.