

इचलकरंजी/ शिरोळ : शांत असणार्या शिरोळ तालुक्यात गेल्या फेब्रुवारी 2025 पासून तब्बल 12 जणांचे खून झाले होते. जानेवारी 2026 च्या पहिल्या महिन्यातच निमशिरगाव आणि जांभळी येथे 2 खून झाले आहेत; तर हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथे गुरुवारी (दि. 29) तरुणाचा धारदार शस्त्राने पाठलाग करून सिनेमा स्टाईलने खून केला. या दोन्ही खुनांमुळे हातकणंगले व शिरोळ तालुक्यांत खळबळ उडाली आहे. कुटुंबातील उमद्या तरुणांचे खून झाल्याने संबंधित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दोन्ही खुनाचे कारण अस्पष्ट असले तरी सर्वसामान्य कुटुंबे खुनामुळे उद्ध्वस्त झाली आहेत, हे निश्चित असून ते चिंताजनक आहे.
शिरोळ येथे दोन खून, जांभळी येथे दोन खून, जयसिंगपूर दोन, तमदलगे दोन असे खुनामागे खून असे सत्र सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी निमशिरगाव येथे पतीने पत्नीचा निर्घृण खून केला; तर दोन दिवसांपूर्वी जांभळी येथील जिम ट्रेनरचा खून करण्यात आला आहे. या खूनप्रकरणी 24 तासांमध्ये इचलकरंजीतील तिघांना पोलिसांनी अटक केली. खुनाचे कारण अस्पष्ट असले तरी एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठविण्याचे धाडस या तरुणांमध्ये येतेच कुठून, हा संशोधनाचा विषय आहे. एवढी टोकाची खुन्नस करून एखाद्याचे जीवनच संपविण्याचा प्रकार निश्चितच धक्कादायक आहे.
हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथे सर्व्हिसिंग सेंटर चालविणार्या शुभम सादळे या तरुणावर घराशेजारीच हल्ला करण्यात आला. हल्ला इतका गंभीर होता की, शुभम घरापर्यंतही पोहोचू शकला नाही. वाटेतच कोसळणार्या शुभमला लगेचच आयजीएम रुग्णालयात आणले असता वैद्यकीय उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. सादळे कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता. खुनांच्या या घटनांनी हातकणंगले, शिरोळ तालुक्यांसह इचलकरंजी शहरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी अशा घटनांना गांभीर्याने घेऊन दोषींवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
शिरोळ तालुक्यालगत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील निपाणी, चिक्कोडी, कागवाड या तीन तालुक्याच्या सीमा आहेत. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचीही सीमा शिरोळ तालुक्यालगतच आहे. येथील गुन्हेगार हे मुक्तपणे तालुक्यात फिरत असतात. शिवाय सांगली, मिरजेतील हद्दपार केलेल्या गुन्हेगारांचा वावर जयसिंगपुरात असल्याने गुन्हेगारीला बळ मिळत आहे.
एकीकडे राज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक सुरू असल्याने बंदोबस्तामध्ये वाढ झाली. याच पार्श्वभूमीवर खून, मारामारी, गंभीर दुखापतीच्या घटना पुन्हा एकदा वाढल्याने पोलिस प्रशासनावर ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे निश्चितच पोलिस प्रशासनानेही या घटनांची गांभीर्याने दखल घेतली आहे.