Dengue Outbreak | यमगेमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ

यमगे : येथे डेंग्यूची साथ आल्याने प्रत्येक घरात सर्व्हे करताना आशा वर्कर.
यमगे : येथे डेंग्यूची साथ आल्याने प्रत्येक घरात सर्व्हे करताना आशा वर्कर.
Published on: 
Updated on: 

मुरगूड : यमगे (ता. कागल) येथे डेंग्यूचे अनेक संशयित रुग्ण आढळत असून, रुग्णसंख्येत वाढ झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेत असून, काहींवर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. काही लहान मुलांना कावीळसदृश आजाराची लक्षणे आढळून आल्याची माहिती आहे.

गावातील मांडवे गल्ली, पोस्ट गल्ली आदी भागांत रुग्णांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरातील एका गावात डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर औषध व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना यमगेतील परिस्थितीकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

आरोग्य विभागाने तातडीने गावाची पाहणी करून संशयित रुग्णांची अधिकृत नोंद घ्यावी. आवश्यकतेनुसार रक्त तपासणी व वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. साचलेले पाणी, गटारी, उघड्या पाण्याच्या टाक्या तसेच डासांची उत्पत्ती होण्याची संभाव्य ठिकाणे शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच गरजेनुसार धूर फवारणी आणि आरोग्य तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

गावातील गटर्सची अस्वच्छता आहे. त्यामुळे डास उत्पती झाली असण्याची शक्यता आहे. गटर्सची स्वच्छता करण्यासाठी कामगारांची कमतरता भासत आहे.

इलिजा कांबळे , प्रशासक, ग्रामपंचायत यमगे

नागरिकांनी घराभोवती पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक पावले उचलल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

यमगे गावात तापाची साथ आहे. डेंग्यूचे रुग्ण दिसत नाहीत. आरोग्य विभागाकडून सव्हे सुरू आहे. ग्रामपंचायतीला दक्षता घेण्यासंबंधी पत्रव्यवहार करून कळवले आहे .आरोग्य पथकही कार्यरत झाले आहे.

डॉ. सौरभ शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.