

कोल्हापूर : व्यसनाधीनता, झटपट प्रसिद्धीची लालसा आणि क्षुल्लक कारणांवरून भाईगिरीच्या आहारी गेलेल्या 17 ते 25 वयोगटातील तरुणाई मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. याचा थेट परिणाम म्हणून कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृह आणि जिल्ह्यातील बालसुधारगृहे या तरुण गुन्हेगारांनी खचाखच भरली आहेत. कोवळ्या वयातील अनेक तरुण, ज्यांच्या ओठांवर मिसरूडही नीट फुटलेली नाही, ते खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकून चार भिंतींच्या आड आपले भविष्य अंधकारमय करत आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब बनली आहे.
कळंबा मध्यवर्ती कारागृहाची मूळ क्षमता 1 हजार 600 कैद्यांची असताना, सध्या येथे तब्बल 1 हजार 989 कैदी आहेत. यामध्ये 997 न्यायाधीन बंदी असून, उर्वरित हजाराहून अधिक कैदी विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, या कैद्यांमध्ये 17 ते 25 वयोगटातील तरुणांची संख्या लक्षणीय आहे, जे खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांत अडकले आहेत. कारागृहात 65 महिला कैदी असून, त्यापैकी बहुतांश 25 ते 35 वयोगटातील आहेत. या परिस्थितीमुळे कारागृह प्रशासनावरील ताणही वाढला आहे.
अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग अधिकच चिंताजनक आहे. जिल्ह्यातील दोन्ही बालसुधारगृहे अल्पवयीन संशयितांनी भरलेली आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी आणि गर्दी मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये या मुलांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते 31 मे 2025 या कालावधीत 180 हून अधिक अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले. यापैकी 30 टक्के मुलांचा खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या तरुण पिढीच्या गुन्हेगारीकडे वळण्यामागे व्यसनाधीनता हे एक प्रमुख कारण आहे. अमली पदार्थ, मद्यसेवन, गांजा आणि नशेच्या गोळ्यांच्या आहारी गेलेली ही मुले सहजपणे गुन्हेगारीच्या मार्गावर ढकलली जात आहेत. व्यसनांमुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून, सामाजिक स्वास्थ्यासाठी हा मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करत या तरुणाईला योग्य दिशा देण्याची गरज निर्माण झाली आहे.