Kolhapur Municipal Corporation | रिव्हिजन सर्व्हे रखडल्याने महापालिकेचा महसूल ठप्प

कधी खासगी एजन्सीचा गोंधळ, तर कधी कर्मचार्‍यांवरील अतिरिक्त भार
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal Corporation
Published on
Updated on

कोल्हापूर : घरफाळा हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार मानला जातो. मात्र, उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या मिळकत रिव्हिजन सर्वेक्षणाच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेला कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागत आहे. 2016 पासून विविध माध्यमांतून हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न झाले; पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणांमुळे हे सर्वेक्षण अर्धवटच राहिले. परिणामी, हजारो मिळकती आजही करजाळ्याबाहेर असून वाढीव बांधकामे आणि वापर बदललेल्या मिळकतींवर महापालिकेला अपेक्षित कर आकारणी करता आलेली नाही.

महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यासाठी 2016 मध्ये सायबरटेक या खासगी कंपनीची नियुक्ती केली होती. तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या प्रकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. संबंधित कंपनीने मिळकतींची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करण्याचे मॉडेल तयार केले होते. त्यामध्ये नळ कनेक्शन, बांधकामाचा प्रकार, वापराचे स्वरूप, क्षेत्रफळ यांसह विविध माहिती नोंदविली जाणार होती. मात्र, प्रत्यक्षात कंपनीने हे काम अर्धवट सोडत महापालिकेकडून सुमारे 1 कोटी 40 लाख रुपये घेतले, पण बदल्यात कोणताही अधिकृत डेटा अथवा कागदपत्रे महापालिकेला उपलब्ध करून दिली नाहीत. त्यामुळे हा प्रकल्पच संशयाच्या भोवर्‍यात सापडला.

यानंतर महापालिकेने स्वतःच्या कर्मचार्‍यांमार्फत रिव्हिजन सर्व्हे सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवडणुका, प्रशासकीय कामांचा अतिरिक्त ताण, मनुष्यबळाची कमतरता आणि इतर विभागीय जबाबदार्‍यांमुळे हे काम पुन्हा रखडत गेले. परिणामी, अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे सर्वेक्षण आजही पूर्णत्वास गेलेले नाही. महापालिकेच्या घरफाळा विभागाच्या नोंदीनुसार शहरात सुमारे 1 लाख 60 हजार मिळकती आहेत. मात्र, शहराची वाढ झपाट्याने होत असताना नव्या इमारती, निवासी संकुले, व्यावसायिक गाळे आणि वाढीव बांधकामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

7 हजार मिळकतधारकांना नोटिसा

दरम्यान, प्राथमिक पाहणीत सुमारे 7 हजार मिळकतींमध्ये वापर बदल, वाढीव बांधकामे किंवा कर आकारणीत तफावत आढळल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे रिव्हिजन सर्वेक्षण पूर्ण झाल्यास महापालिकेच्या महसुलात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रक्रियेला अखेर गती मिळणार का, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news