63 lakh fraud case | अटक वॉरंट रद्द करण्याच्या आमिषाने सेवानिवृत्ताला 63 लाखांना लुबाडले

गांधीनगरातील प्रकाराने खळबळ
63 lakh fraud case
63 lakh fraud case | अटक वॉरंट रद्द करण्याच्या आमिषाने सेवानिवृत्ताला 63 लाखांना लुबाडले(File Photo)
Published on
Updated on

गांधीनगर : तुमच्या मोबाईलवरून आक्षेपार्ह मजकूर पाठविण्यात आला आहे, तुमच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे अटक वॉरंट आहे, असे सांगून हे वॉरंट रद्द करण्याचे आमिष दाखवून गोपाळ गजानन साळोखे (वय 63, रा. कोयना वसाहत, गांधीनगर) यांची 62 लाख 95 हजार 606 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गांधीनगर पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपाळ साळोखे हे एस.टी. महामंडळातून मेकॅनिकल या पदावरून निवृत्त झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात त्यांना एका मोबाईलवरून एका अज्ञाताने सांगितले की, मुंबईतील कुलाबा पोलिस ठाणे येथून पोलिस अधिकारी बोलत आहे. तुमच्या (साळोखे) आधार कार्डवरून सिम कार्ड घेण्यात आले असून, त्याचा वापर करून मोबाईलवरून आक्षेपार्ह मजकूर पाठविल्याच्या तक्रारी हिमाचल प्रदेश आणि हरियाणा येथे दाखल झाल्या आहेत. तसेच, तुमच्या एटीएम कार्ड आणि बँक खात्यावरून मनी लाँडरिंगचे 25 ते 26 कोटी रुपयांचे व्यवहार होऊन त्यातून 237 एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. त्याचबरोबर तुमच्या खात्यावरून ‘पीएफआय’ या दहशतवादी संघटनेच्या खात्यावर आर्थिक व्यवहार झाले आहेत; त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे, अशी बतावणी करून अज्ञात व्यक्तीने वरिष्ठ अधिकार्‍यांचे आयडी कार्ड पाठवून विश्वास संपादन केला.

अटकेपासून वाचविण्यासाठी फिर्यादी गोपाळ साळोखे यांना त्यांच्या सर्व बँक खात्यातील, तसेच पोस्टातील ठेवी एकत्रित करून संशयिताच्या आयसीआयसीआय बँक आणि करूर वैश्य बँकेच्या खात्यामध्ये 62 लाख 95 हजार 606 रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. तपास पूर्ण झाल्यानंतर ही सर्व रक्कम आरबीआयच्या गाईडलाईननुसार परत देण्याचे आश्वासनही अज्ञाताने साळोखे यांना दिले. 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2025 दरम्यान हा सर्व प्रकार झाला. संशयित अज्ञाताने मोबाईल क्रमांक 8942963467 आणि 8835249791 वरून फसवणूक केल्याने साळोखे यांनी गांधीनगर पोलिसांत ही फिर्याद दाखल केली. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news