

कोल्हापूर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांशी तुमचे संबंध आहेत. त्यांना आर्थिक सहाय्य करीत असल्याने देशद्रोहाच्या गुन्ह्यात कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होईल, अशी धमकी देऊन सायबर भामट्यांनी निवृत्त अभियंता दत्तात्रय गोविंद पाडेकर (वय 75, रा. तात्यासाहेब मोहिते कॉलनी, यशवंत लॉनजवळ) यांच्याकडून 7 कोटी 86 लाख 21 हजार 696 रुपये उकळले. 26 मे ते 23 जून 2025 या काळात घडलेला हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीला आला.
पाडेकर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. भामट्यानी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे-पाटील, कुलाबा (मुंबई) पोलिस ठाण्यांसह ईडी व सेबीतील वरिष्ठ अधिकार्यांचा हुबेहूब आवाज काढून गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे. पाडेकर हे जामनगर (गुजरात) येथील रिलायन्स इंडस्ट्रीज येथे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून 14 वर्षे कार्यरत होते. 2012 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतरही कंपनीने त्यांना 2016-17 मध्ये बोलावून घेतले. 2017 पासून पत्नी सुरेखा यांच्यासमवेत त्यांचे कोल्हापूर येथे वास्तव्य आहे. त्यांची तीन मुले परदेशात आहेत.
विजयकुमार नामक व्यक्तीने 24 मे रोजी मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. आपण डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगून तुमचा डाटा लिक झाला आहे, असे सांगितले. आधार कार्डचे शेवटचे चार अंक विचारले. अंक सांगताच भामट्याने आधार कार्डचा वापर करून 26 एप्रिल रोजी तुमच्या नावाने अंधेरी पूर्व मुंबई येथून नवीन मोबाईल विकत घेतला आहे, असे सांगण्यात आले.पीएफआयला फंडिंग केल्याचा आरोप
भामट्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या लोकांचे त्यांना फोटो व्हॉटसअॅपवर पाठविले. फोटोतील लोकांना आपण ओळखत आहात का, असा सवाल करून एका बँकेचे स्टेटमेंट पाडेकर यांना पाठविले. हे अकाऊंट मुंबई ब्रॅंचचे असून त्याद्वारे तुमचे पीएफआयला फंडिंग झाले आहे, असे सांगण्यात आले.