

कोल्हापूर : राजकीय नशीब आजमावण्यासाठी आलेल्या इच्छुकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी भरलेले सभागृह... क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा... सोयीचे आरक्षण असणार्या नावाची चिठ्ठी निघताच इच्छुकांच्या चेहर्यावर ओसंडून वाहणारा आनंद... तर आरक्षणामुळे संधी हुकल्याने काहींच्या चेहर्यावर दिसणारी निराशा... अशा वातावरणात सोमवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. जिल्हा परिषद मतदारसंघांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती ताराराणी सभागृहात तर पंचायत समितीचे मतदारसंघांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी सोडत काढण्यात आली. यामध्ये चंदगड, भुदरगड व कागल तालुक्यातील सर्व गट आरक्षित झाले आहेत.
हातकणंगलेतील 11 पैकी 10 तर शिरोळमधील 7 पैकी 6 गट आरक्षित झाले आहेत. सकाळी अकरा वाजता आरक्षण प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रथम आरक्षणाची प्रक्रिया समजून सांगितली. त्यानंतर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. प्रथम लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जातीसाठी 9 मतदारसंघांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सोडत काढण्यात आली. एस्तर पॅटर्न प्राथमिक शाळेच्या अनुराधा रणभिसे व साक्षी जाधव या मुलींंच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. आरक्षण प्रक्रिया संपेपर्यंत सभागृहात आशा-निराशेचा खेळ पाहावयास मिळत होता.
लहान मुलांच्या हस्ते एकामागून एक मतदारसंघांची नावे जाहीर होत गेली. कोणाच्या नावाची चिठ्ठी याबाबत सभागृहात प्रत्येक चिठ्ठी काढताना उत्कंठा वाढत होती.
चंदगड व भुदरगड तालुक्यात प्रत्येकी चार तर कागलमध्ये सहा मतदारसंघ आहेत. हे सर्व मतदारसंघ राखीव झाल्यामुळे तालुक्यातून नाराजी व्यक्त होत आहे. आजरा तालुक्यातील सर्व मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गसाठी खुले राहिले आहेत.
आरक्षण सोडतीची माहिती देत असताना गेल्या वेळी निश्चित केलेले आरक्षण रद्द करण्यात आल्याचे सांगितल्यानंतर उपस्थितांमधून हे आरक्षण तरी टिकंल नव्हं, असा प्रश्न करताच सभागृहात हशा पिकला.
जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. सभागृहात 50 टक्के आरक्षण असतानाही आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी सभागृहात एकही महिला कार्यकर्ती उपस्थित नव्हती. याची चर्चा सुरू होती.