kolhapur | विनाखवल्याच्या पाणदिवड सर्पाची जागतिक पातळीवर नोंद

Research on a rare scaleless snake has been recorded at the global level
Published on
Updated on

कोल्हापूर : नागपूर शहरातील एका निवासी भागातून पकडण्यात आलेल्या विनाखवल्याच्या दुर्मीळ पाणदिवड सापाच्या संशोधनाची नोंद जागतिक पातळीवर झाली आहे. सोलापूर येथील सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी अमेरिकेतील रेप्टाइल्स अँड अँफिबियन्स या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये 26 जानेवारी रोजी प्रकाशित केली आहे. यातून भारतामधून पाणदिवड सापात मेरोलेपिडोसिसची ही पहिलीच अधिकृत नोंद ठरली आहे. यासाठी त्यांना कोल्हापूरचे सर्पमित्र देवेंद्र भोसले, ओंकार यादव, सांगलीचे युनूस मणेर, नागपूरचे संतोष सोनी, गजू पटले आणि सोलापूरचे अनिल अलदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सामान्यतः सापांसह सर्वच सरपटणार्‍या प्राण्यांच्या शरीरावर खवले असतात. हे खवले बीटा-केराटिन या प्रथिनांपासून तयार होतात. त्वचेला मजबुती देणे, शरीरातील पाणी टिकवून ठेवणे तसेच घर्षण, अतिनील किरण आणि भक्षकांपासून संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. मात्र काही दुर्मीळ प्रसंगी जनुकीय किंवा पर्यावरणीय कारणांमुळे या प्रथिनांची निर्मिती बाधित होते आणि सापाच्या शरीरावर खवले तयार होत नाहीत. सापाच्या शरीरावर अंशतः किंवा पूर्णपणे खवले नसण्याच्या या अवस्थेला इंग्रजीत स्केललेस तर शास्त्रीय भाषेत ‘मेरोलेपिडोसिस’ असे म्हटले जाते.

ही अवस्था सापांमध्ये अत्यंत दुर्मीळ मानली जाते. नागपूर येथे 11 जुलै 2024 रोजी दुपारी एका घरातून सर्पमित्र संतोष सोनी व गजू पटले यांनी हा सर्प पकडला. सापाची एकूण लांबी सुमारे 60 सेंटीमीटर होती. निरीक्षणादरम्यान सापाच्या पाठीवर खवले नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. हा साप अनोखा वाटल्याने सोनी व पटले यांनी त्याची छायाचित्रे राहुल शिंदे यांना पाठवली. हा मेरोलेपिडोसिसचा प्रकार असल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. अभ्यासाअंती पाणदिवड सापामध्ये अशा प्रकारची नोंद यापूर्वी कुठेही झाली नसल्याचे स्पष्ट झाले. सखोल तपासणी व नोंदीनंतर हा साप योग्य अशा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news