

कोल्हापूर : सोंड्या, घनचक्र, भैरव अन् पडकोटाचा बुरूज, सामानगडावरील बुरुजांच्या नावांसह गडावरील महत्त्वपूर्ण माहिती प्रकाशात आली आहे. पुणे येथील इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ज्ञ राज चंद्रकांत मेमाणे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजजवळच्या सामानगडाचा मोडी लिपीतील 18 व्या शतकातील नकाशा शोधून काढला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास वास्तुसंग्रहालयातील मोडी कागदपत्रांचा अभ्यास करत असताना राज मेमाणे यांना सामानगडाचा हा मोडी लिपीतील महत्त्वपूर्ण नकाशा नुकताच सापडला. नाना फडणवीस यांच्या दफ्तरातील कागदपत्रांचा अभ्यास करताना त्यांना या नकाशाचा उलगडा झाला. नकाशाच्या कागदावर कोणतीही तारीख, वार नाही; पण त्यावरील मोडी लिपीच्या अक्षराच्या वळणावरून हा नकाशा 18 व्या शतकाच्या उत्तरार्धातील असावा. या संशोधन कार्यासाठी मेमाणे यांना इतिहास संग्रहालय, डॉ. आंबेडकर विद्यापीठ येथील सौ. पुष्पा गायकवाड, मच्छिंद्र चौधरी, कुमार भवर, डॉ. अमोल कुलकर्णी, सुधीर बलखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिवकाळात इसवी सन 1674 साली झालेल्या नेसरी खिंडीची लढाई (वेडात मराठे वीर दौडले सात) सरसेनापती प्रतापराव गुजर व त्यांच्या सहा वीरांचा स्फूर्तिदायी इतिहास सामानगडाशी संबंधित आहे. इसवी सन 1844 साली भारतभर झालेल्या स्वातंत्र्यलढ्यातील गडकरी उठावाची सुरुवात सामानगडावर झेंडा बुरुजावरून बंडाचे निशाण फडकावून झाली होती.
नकाशावरून तत्कालीन सामानगडाचे विस्तृत चित्र स्पष्ट होते. या नकाशात उल्लेख असलेल्या प्रमुख गोष्टी पुढीलप्रमाणे : सामानगडावरील बुरुजांची नावे : सोंड्या बुरूज, घनचक्र बुरूज, भैरवाच्या तोफेचा बुरूज आणि पडकोटाचा बुरूज. किल्ल्यावरील प्रमुख इमारती : भवानी मंदिर, श्री केदार मंदिर, सरकारवाडा, सदर, दारूखाना, हवालदाराचे घर, श्री क्षेत्रपाल देऊळ, उत्तर दरवाजा, दक्षिण दरवाजा, जीभीचा दरवाजा आदी. शिवाय, किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यांची मोजमाप, त्यांची खोली यांची माहिती नकाशामधून मिळाली आहे.