Ambabai Temple | आठ खांबांचे माप चुकले, गरुड मंडपाचे काम रखडले; तीनदा चूक की घोडचूक?

यंदाचा नवरात्रौत्‍सवही गरुड मंडपाविनाच!
कोल्हापूर : गरुड मंडपाच्या फरशी खोदाईमुळे ८ खांबांच्या मापात फरक पडल्याने सध्या काम बंद आहे.
कोल्हापूर : गरुड मंडपाच्या फरशी खोदाईमुळे ८ खांबांच्या मापात फरक पडल्याने सध्या काम बंद आहे. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

अनुराधा कदम

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या खांबांचे माप आतापर्यंत तीनदा चुकल्याने सातत्याने मंडप उभारणीमध्ये व्यत्यय येत आहे. सध्या ८ लाकडी खांबांची उंची तब्बल सहा इंचांनी कमी असल्याचे निदर्शनास आल्याने ६ महिन्यांपासून खांब उभारणीचे काम ठप्प आहे. त्‍यामुळे यंदाचा नवरात्रौत्‍सवही गरुड मंडपाविनाच होण्याची शक्यता आहे.

खांबांना तडे गेल्याने जानेवारी २०२३ मध्‍ये मंडप उतरवला. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये प्रत्यक्ष खांब उभारणीला सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीपासूनच खांबांचे माप चुकले असून ही चूक की घोडचूक, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. नवे ४८ खांब कर्नाटकातील सागवानापासून तयार केले; मात्र त्यापैकी १५ खांब खराब असल्याचे लक्षात येताच पुन्हा नव्याने लाकडाचा शोध घेऊन खांब तयार केले.

किरणोत्सव मार्गात घोडचुकीमुळे अडथळे

किरणोत्सव मार्गाचाही विचार न करता नव्या गरुड मंडपाची उंची कमी झाल्याचे अधोरेखित झाल्याने तयार ८ खांबांची उंची सहा इंचांनी कमी असल्याचे निदर्शनास आले. परिणामी, संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करावी लागली.

मंडपाच्या फरशीचे काम सुरू असताना तीन फुटांचा पाया भर घातला. त्यामुळे खांबांची उंची कमी झाली. नव्या मोजमापानुसार तयार होणारे खांब प्रत्यक्षस्थळी पोहोचण्यासाठी आठ ते दहा दिवस लागणार.

डॉ. विलास वहाणे, सहायक संचालक, पुरातत्त्‍व विभाग

पुरातत्त्‍व विभागाचा हलगर्जीपणा व दुर्लक्ष गरुड मंडपाच्या विलंबास कारणीभूत आहे. कोणताही पूर्वाभ्यास न करता गरुड मंडपाचे काम सुरू आहे.
दिलीप देसाई, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news