

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत यावर्षीची कर्जे कर्जमाफीस पात्र नसल्याने शेतकर्यांनी चालू वर्षातील वसूलपात्र पीककर्जाची मुदतीत परतफेड करावी, असे आवाहन केडीसीसी बँकेचे अध्यक्ष तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
राज्य शासनाने शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी ही योजना जाहीर केली असून, 30 जून 2025 अखेर थकीत असलेली तसेच 30 सप्टेंबर 2025 अखेर दोन लाख रुपयांपर्यंत शिल्लक असलेले पीककर्ज थकबाकी कर्जमाफीस पात्र ठरणार आहे. तसेच सन 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या आर्थिक वर्षांत नियमित पीककर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांची माहिती बँकांकडून संकलित करून शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. राज्यातील पीककर्ज, मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाची माहितीही शासनाकडून मागविण्यात आली आहे.
दरम्यान, रब्बी अर्थात ऊस हंगामासाठी 1 जुलै 2024 ते 30 जून 2025 या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या कर्जाची परतफेडीची मुदत 30 जून 2026 पर्यंत आहे. त्यामुळे हे कर्ज कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र ठरणार नाही. त्यामुळे प्रोत्साहनपर लाभ मिळविण्यासाठी चालू वर्षातील कर्जाची मुदतीत परतफेड करणे आवश्यक असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
* 30 जून 2025 अखेरची थकबाकी कर्जमाफीस पात्र
* 30 सप्टेंबर 2025 अखेर दोन लाखांपर्यंत शिल्लक पीककर्ज ग्राह्य
* नियमित कर्जफेड करणार्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ
* चालू वर्षाचे कर्ज 30 जून 2026 पूर्वी भरणे आवश्यक
* मुदतीत परतफेड न केल्यास लाभापासून वंचित राहणार