

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) परिसरातील इमारतींचे नूतनीकरण सुरू आहे. या कामामुळे इमारतींच्या काही चांगल्या भिंती कमकुवत होत आहेत. नव्याने केलेला गिलावा ढासळत आहे. यामुळे तब्बल 43 कोटींचा निधी असूनही कामाच्या दर्जाबाबत साशंकता आहे.
सीपीआरच्या नूतनीकरणासाठी 43 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी इमारतीसाठी 31.98 कोटी, रस्ते दुरुस्तीसाठी 7.95 कोटी, तर विद्युत यंत्रणा याकरिता 3.8 कोटी निधी खर्च केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्च 2024 पासून कामे सुरू आहेत. 1884 पासून रुग्णसेवत असलेल्या सीपीआरची ऐतिहासिक इमारत दणदणीतच आहे. या इमारती भोवती 10 एकर परिसरात गेल्या 30-40 वर्षांत बांधकाम केलेल्या छोट्या-मोठ्या 33 इमारती आहेत. किरकोळ कामे वगळता सर्व इमारती ठिकठाक आहेत; मात्र काही इमारतीतील फरशा, भिंतीचा गिलावा, रंग, खिडक्या, फिटिंग काढून नूतनीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी ही कामे करण्याची गरज नसताना ब—ेकरने तोडफोड करून, त्यावर हातोडा घालण्यात आला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भिंतींना हादरे बसले आहेत. काही ठिकाणचा गिलावा ढासळू लागला आहे. भिंतींच्या रंगाचे टवके पडू लागले आहेत. यामुळे कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
वेदगंगा इमारतीमधील वॉर्ड, कोयना इमारतीमधील वॉर्ड, प्रसूतिगृह, बाह्यरुग्ण विभागाचा पहिला व दुसरा मजला, क्षयकिरणशास्त्र, विभाग, नेत्र विभाग, बर्न वॉर्ड, अधिष्ठाता कार्यालय, दगडी इमारतीमधील कार्यालये आदींची कामे अपूर्ण आहेत. मनोविकार विभाग, बाह्यरुग्ण विभाग, तिसरा मजला, दूधगंगा इमारतीमधील पाच पैकी तीन वॉर्ड पूर्ण, मुख्य शस्त्रक्रिया विभाग, हृदय शस्त्रक्रिया विभाग, स्त्रीरोग विभागातील शस्त्रक्रिया गृह, कैदी वॉर्ड, अंतरवासिता डॉक्टर वसतिगृह, नर्सिंग कॉलेज वसतिगृह ही कामे पूर्ण झाली आहेत. नवीन अपघात विभाग, नवजातशिशू अतिदक्षता विभाग, बालरोग विभाग, पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, मेडिसीनचा अतिदक्षता विभाग, एक्स-रे विभाग, रस्ते, ड्रेनेज ही कामे सध्या सुरू आहेत.
ही सर्व कामे राजकीय नेत्यांच्या बगलबच्चांनी घेतल्याची चर्चा सुरू आहे. इमारतींचे काम पुणे येथील तर रस्त्याचे काम कागल येथील ठेकेदाराने घेतले आहे. रस्त्यांच्या ठेकेदारला सुमारे 1, तर इमारतींच्या कामे करणार्या ठेकेदारला कामांच्या मोबदल्यात सुमारे 5 कोटी दिल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांनी सांगितले.
सीपीआरमध्ये सध्या सुरू असलेली कामे पाहता आणि त्यासाठी मंजूर झालेला निधीचा विचार करता, निधी जास्त आणि खर्च कमी, अशीच चर्चा आहे.