Temperature Rise | कोल्हापूर फेब्रुवारीतच तापले; पाच दशकांचे रेकॉर्ड मोडले

Temperature Rise |
Temperature Rise | कोल्हापूर फेब्रुवारीतच तापले; पाच दशकांचे रेकॉर्ड मोडलेPudhari File Photo
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानाने उसळी घेतल्याने शहरासह जिल्ह्यात कमालीचा उकाडा जाणवत आहे. परिणामी फेब्रुवारीमहिन्यातच कोल्हापूर अक्षरशः तापले आहे. धक्कादायक बाब म्हणजे रविवारची रात्र ही गेल्या पाच दशकांतील सर्वाधिक उष्ण रात्र ठरली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार 1969 पासूनच्या आजवरच्या फेब्रुवारीमहिन्यातील ‘सर्वाधिक किमान तापमानाचे’ रेकॉर्ड 22 फेब्रुवारीरोजी मोडीत निघाले असून उच्चांकी 23.3 किमान तापमानाची नोंद झाली.

किमान तापमानातील ही वाढ केवळ सांख्यिकीय बदल नसून, ती ऋतुचक्रातील अनियमिततेची धोक्याची घंटा मानली जात आहे. साधारणपणे फेब्रुवारीमहिन्यात रात्रीच्या वेळी सुखद गारवा असतो; मात्र आता किमान तापमानच 23 अंशांच्या पुढे गेल्याने रात्रीचा उकाडा लक्षणीयरीत्या वाढला आहे. 1969 पासूनच्या हवामान आकडेवारीवर नजर टाकल्यास केवळ मागील एका दशकातच (2016 ते 2026) सर्वाधिक किमान तापमानाचे सर्व उच्चांक गाठले गेल्याचे स्पष्ट होते.

वाढते शहरीकरण आणि जागतिक तापमानवाढीचा हा थेट परिणाम असून, आगामी काळात उन्हाळ्याची तीव—ता अधिक असू शकते, असा अंदाज या हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. यामुळेच कोल्हापुरात फेब्रुवारीमहिन्यातच उन्हाचा जोरदार तडाखा सहन करावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे दिवसाच्या तापमानासह रात्री देखील नागरिकांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. हिवाळ्याच्या अंतिम टप्प्यात जाणवणारी ही अनैसर्गिक उष्णता हवामान बदलाचे गंभीर संकेत देत आहे. यापूर्वी हा सर्वाधिक किमान तापमानाचा विक्रम 2016 च्या फेब्रुवारीमहिन्याच्या नावे होता. 29 फेब्रुवारी 2016 रोजी 23.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती.

सर्वाधिक किमान तापमान म्हणजे काय?

सर्वाधिक किमान तापमान म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीतील सर्वात उष्ण रात्र. हवामानशास्त्रानुसार, 24 तासांच्या चक्रातील सर्वात कमी तापमान साधारणपणे मध्यरात्रीनंतर किंवा पहाटे नोंदवले जाते, ज्याला ‘किमान तापमान’ म्हणतात. अनेक वर्षांच्या किमान तापमानाच्या आकडेवारीची तुलना केल्यास नीचांकी नोंदींमधील सर्वात मोठी किंवा उच्चांकी नोंद म्हणजे सर्वाधिक किमान तापमान. किमान तापमान जितके खाली जाणे अपेक्षित असते, तितके ते न जाता त्याने आजवरचा उच्चांक गाठलेला असतो.

पारा 35 अंशांवर; पावसाचाही शिडकावा

दिवसभर ढगाळ वातावरणासह उन्हाचा तडाखा देखील चांगलाच होता. दैनंदिन कमाल तापमानात 1.5 अंशाची वाढ होऊन पारा 34.9 अंशांपर्यंत उसळला होता; तर 5.7 अंशांची वाढ होऊन किमान तापमान 23.3 अंशांवर होते. रविवारी मध्यरात्रीपासून शहरात पावसाचा हलका शिडकावा सुरू होता. अधून मधून पावसाचे थेंब पडत होते. पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोल्हापुरातील फेब्रुवारीतील उच्चांकी किमान तापमान

23.3 (22-02-2026)

23.2 (29-02-2016)

23.1 (28-02-2016)

23.0 (29-02-2024)

22.9 (28-02-2024)

22.8 (22-02-2016)

22.6 (23-02-2016)

22.5 (21-02-2016)

22.1 (24-02-2019)

21.9 (23-02-2019)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news