Kolhapur Municipal Corporation election | बंडखोरीचा ठसका अन् तिसर्‍या आघाडीचा धसका!

दोन्हीकडील मित्रपक्षांच्या समावेशाने तिसर्‍या आघाडीला ताकद शक्य
Kolhapur Municipal Corporation election
Kolhapur Municipal Corporation election | बंडखोरीचा ठसका अन् तिसर्‍या आघाडीचा धसका!Pudhari File Photo
Published on
Updated on

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी व ठाकरे शिवसेना महाविकास आघाडी म्हणून एकत्र येणार, असे वाटत असतानाच शरद पवार राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर पडल्यामुळे त्यांनी नवी आघाडी शोधली आहे. महायुतीतील तीन घटक पक्षांतच एका-एका जागेसाठी ताणाताणी चालली आहे. त्यातच ताराराणी आघाडी आहे. परत जनसुराज्यला किती जागा द्यायच्या व कोठून द्यायच्या, असा प्रश्न आहे. त्यामुळे जनसुराज्य पक्ष वेटिंगवर आहे. त्यांना तिसर्‍या आघाडीने आपल्या सोबत येण्यासाठी सोमवारचा अल्टिमेटम दिला आहे. बंडखोरी व तिसर्‍या आघाडीचा फटका कोणाला बसणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मुळात राज्यात कुठेही नव्हती तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची एकत्रित सत्ता कोल्हापूर महापालिकेत होती; मात्र राज्यातील सत्तांतर व शिवसेना तसेच राष्ट्रवादीतील फुटीमुळे जिल्ह्यातील सत्तेचा समतोलही बिघडला. राष्ट्रवादी व शिवसेनेला भाजपसमवेत जावे लागले, तर उर्वरित राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीत समाविष्ट होणार, हे जवळजवळ स्पष्ट झाले होते.

मात्र, जागावाटपावरून त्यांच्यातील मतभेद टोकाला गेले व शरद पवार राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर पडली व ठाकरे शिवसेनेला काँग्रेसने दिलेल्या जागांवर समाधान मानावे लागले. तीच अवस्था महायुतीत जनसुराज्य शक्ती पक्षाची आहे. आता या दोन्ही पक्षांना नवी भूमिका घ्यावी लागणार आहे. यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे पूर्वी 9 नगरसेवक होते, तर या पक्षाचे दोन महापौर झाले आहेत. राष्ट्रवादी तर कायम सत्तेत राहिली होती; मात्र पक्षफुटीनंतर चित्र बदलले. आता राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असून ते मंत्री आहेत, तर शरद पवार राष्ट्रवादीकडे एकही खासदार, आमदार नाही.

महायुतीत राष्ट्रवादीने 20 जागांची मागणी केली. तडजोड म्हणून 17 जागा घेण्याची तयारी दाखविली; मात्र 15 जागांवर त्यांना समाधान मानावे लागेल असे चित्र आहे. महाविकास आघाडीत शरद पवार राष्ट्रवादीनेही 20 जगांची मागणी करत तडजोड म्हणून 14 जागांवर समाधान मानू असे सांगितले; मात्र काँग्रेसकडून समाधानकारक जागांचा प्रस्ताव आला नसल्याने ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले. ते आता तिसर्‍या आघाडीत सहभागी झाले आहेत.

जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यांना किमान दहा जागा हव्या आहेत; पण तेथे ज्या पक्षाचा मित्रपक्ष त्यांच्या कोट्यातून त्यांना जागा असे ठरले आहे. त्यामुळे जनसुराज्य शक्तीला भाजपच्या कोट्यातून जागा देणे शक्य नसल्याने त्यांनाही वेगळी भूमिका घ्यावी लागेल असे दिसते. आता ते स्वतंत्ररित्या रिंगणात उतरणार की आघाडी करणार, हे पाहावे लागेल. कारण, जनसुराज्यला तिसर्‍या आघाडीकडून संपर्क साधण्यात आला आहे. सोमवारपर्यंत निर्णय घ्या, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.

उमेदवारीचा शब्द देऊन पक्षात घेतलेल्यांचे काय?

भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या महायुतीतील घटक पक्षांनी आपल्याच पक्षाचा महापालिकेवर झेंडा व आपलाच महापौर करण्याच्या ईर्षेपायी अनेकांना उमेदवारीचा शब्द देऊन पक्षात प्रवेश दिला. त्यांच्या पक्ष प्रवेशाचे सोहळे दणक्यात पार पडले; मात्र आता उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा अगोदरचे निष्ठावंत, निवडून येण्याची पात्रता, खर्च करण्याची क्षमता हे सगळे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या उमेदवारीचा शब्द देऊन पक्षात आणलेल्यांचा फटका कोणाला बसणार, त्यावर अनेक प्रभागांतील निकाल अवलंबून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news