

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीतील सर्वात निर्णायक टप्पा शुक्रवारी पार पडला असला, तरी प्रत्यक्षात राजकीय रणधुमाळी आता अधिक तीव— होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. उमेदवारी नाकारल्याच्या नाराजीतून उफाळून आलेली बंडखोरी आणि ती रोखण्यासाठी वापरलेले दबावतंत्र या संघर्षातूनच निवडणुकीचे अंतिम चित्र साकारले आहे. काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अशीच स्थिती आहे. पक्षशिस्त आणि वैयक्तिक राजकीय अस्तित्व यांच्यातील ताण आता उघडपणे दिसून येत आहे.
‘भाजप’ला बंडखोरीचे आव्हान
उमेदवारीवरून भारतीय जनता पक्षात सुरू झालेल्या बंडाळीवर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी साम, दाम, दंडासह समजुतीचा उतारा निघाला. अनेकांना शासकीय समित्यांचे गाजर दाखवून बंड थंड करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे; मात्र जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर गेलेल्या बंडखोरांची बंडाळी कायम असून निवडणुकीत भाजपला हेच खरे आव्हान आहे.
महायुतीतील जागा वाटपावरून भाजपमध्ये पहिल्यापासून खदखद आहे. बूथ पातळीवर काम करूनही उमेदवारी मिळत नसल्याने अनेकांच्यात प्रचंड नाराजी निर्माण झाली. नाराज कार्यकर्त्यांनी नेत्यांवर आरोप करून उमेदवारी अर्ज दाखल केले होते; मात्र शुक्रवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी घडल्या. शनिवारी कोल्हापुरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होत आहे. चव्हाण यांच्या कोल्हापूर दौर्यापूर्वी बंड थंड करण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बहुतांश बंडखोरांशी संपर्क साधून त्यांना शासकीय समित्यांवर घेण्याचा शब्द दिला. काहींची समजूत काढून पुढीलवेळी नक्की विचार करू, अशी ग्वाही दिली. यामध्ये प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनीही विविध प्रभागांतील बंडखोरांना विनंती करण्याचा प्रयत्न केला. रविकिरण गवळी यांनी मधुरिमा रविकिरण गवळी यांची, तर विशाल शिराळकर यांनी पूजा विशाल शिराळकर यांची जनसुराज्य शक्ती पक्षातील उमेदवारी कायम ठेवून बंडाळी केली आहे.
आ. सतेज पाटील यांच्याकडून दबाव, विनवणी अन् कमिटमेंट
महापालिका निवडणुकीतील बंडखोरी रोखण्यासाठी आणि पक्ष शिस्त टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसने संपूर्ण ताकद पणाला लावली. या सार्या हालचालींचे केंद्र ठरले अजिंक्यतारा कार्यालय. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत येथे तळ ठोकून उमेदवार, समर्थक, पदाधिकार्यांच्या भेटीगाठींचा सपाटा लावला.
गुरुवारी रात्रीपासूनच माघारीसाठी हालचालींना वेग आला होता. अजिंक्यतारा कार्यालयातून चार माजी नगरसेवक आणि प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांवर उमेदवारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. फोनवरून आ. सतेज पाटील यांचा थेट संदेश पोहोचवला जात होता. काही उमेदवारांना प्रत्यक्ष बोलावून घेऊन, स्वतंत्रपणे चर्चा करत माघारीसाठी तयार करण्यात आले. या प्रक्रियेत काही माजी नगरसेवकांचाही समावेश होता, ज्यांची नाराजी पक्षासाठी धोकादायक ठरू शकली असती. सिरद मोहल्ला येथे दुपारी इच्छुक उमेदवारांची एकत्र बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत आ. सतेज पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडत, ‘आजचा निर्णय उद्याचे राजकारण ठरवेल,’ असा इशारा दिला. रुसवा, नाराजी, संताप आणि पुढील राजकीय कमिटमेंट अशा संमिश्र वातावरणात अखेर काहींनी माघार घेतली, तर काहींची मनधरणी सुरूच राहिली.
माघार घेणार्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
माघार घेणार्या उमेदवारांचे फोटो तत्काळ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत होते. संबंधित प्रभागात अधिकृत उमेदवार कोण, याची माहिती झपाट्याने मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा हा रणनीतीचा भाग होता. सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा वापर करून माघार उमेदवारांची माहिती प्रभागात पसरविण्याचा प्रयत्न केला.
आ. क्षीरसागर यांनी बंडखोरी शमवली
उमेदवारी न मिळाल्याने काही प्रभागात शिवसेनेकडून इच्छुकांनी बंडखोरी केली होती. शुक्रवारी (दि. 2) माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेना नेते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांनी बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने महत्त्वाच्या प्रभागातील शिवसेनेची बंडखोरी शमली.
प्रभाग क्रमांक 2 मधून अरविंद मेढे, जिल्हा उपप्रमुख विनय वाणी, प्रभाग क्रमांक 6 मधून अनुसूचित जाती-जमातीचे जिल्हाप्रमुख नीलेश हंकारे, प्रभाग क्रमांक 11 मधून आशिष पोवार, संदीप पोवार, भाग्यश्री किशोर माने, प्रभाग क्रमांक 7 मधून अभिजित सांगावकर, सचिन बिरंजे, प्रभाग क्रमांक 12 मधून माजी नगरसेवक जितू सलगर, रवींद्र पाटील, प्रभाग क्रमांक 14 मधून शशिकांत रजपूत यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यासाठी गेले दोन दिवस आ. क्षीरसागर यांनी बैठकांच्या माध्यमातून या उमेदवारांचे मनपरिवर्तन केले. त्यांच्या या प्रयत्नाने शिवसेनेतील बंडखोरी शमल्याचे दिसून आले.
आ. क्षीरसागर यांनी उमेदवारी न मिळालेल्या पदाधिकारी, शिवसैनिकांना महामंडळे, राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील शासनाच्या विविध समित्या, स्वीकृत नगरसेवक, शिक्षण समिती, परिवहन समिती सदस्यपदावर नियुक्तीचे आश्वासन दिले.
पक्षांतील असंतोष, नाराजी कोणाच्या फायद्याची?
नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत समजूत, विनवणी, आश्वासने आणि थेट दबाव यांचा वापर करत बंडाळी थोपवण्याचा प्रयत्न केला. जिथे समजुतीचा सूर चालला तिथे माघारी झाली; मात्र अनेक ठिकाणी उमेदवारांनी दबाव झुगारून स्वतंत्र लढत कायम ठेवली. त्यामुळे काही प्रभागांत दुरंगी लढत अपेक्षित असताना आता तिरंगी अथवा चौरंगी लढती अटळ ठरल्या आहेत. ही बंडखोरी केवळ उमेदवारीपुरती मर्यादित नसून, पक्षांतर्गत असंतोष, नेतृत्वावरील नाराजी आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवरही तिचा प्रभाव पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पाहता माघारीचा दिवस संपला असला, तरी बंडाचे निशान खाली न पडता अधिक ठळक झाले आहे. आता ही बंडखोरी कोणाला फायदा अन् तोट्याची हे लवकरच कळेल.