

कोल्हापूर : टियर थ्री शहर म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर आता विकासाच्या एका नव्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर येथेही गगनचुंबी इमारतींचे प्रकल्प आकाराला येत असून, शहराला हळूहळू एक नवी ओळख निर्माण होत आहे. कोल्हापूरचे गृहनिर्माण क्षेत्र कोरोना काळातील आर्थिक मंदीतून सावरले असून आता या क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे. आधुनिक जीवनशैली आणि ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दिशेने बांधकाम व्यावसायिकही सज्ज झाले आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या 2016 मधील नव्या विकास नियमावलीने बांधकाम क्षेत्राला मोठी चालना दिली आहे. वाढीव एफएसआयमुळे (चटई क्षेत्र निर्देशांक) शहरात अनेक उंच इमारतींना बांधकाम परवाने मिळाले असून, हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर शहरात सुमारे 45 लाख चौरस फूट बांधकाम उपलब्ध होणार असून अनेक बांधकामे प्रगतिपथावर आहेत. यामुळे केवळ शहराचा चेहरामोहराच बदलणार नाही, तर उच्चभ्रू परिसरातील या उंच इमारती कोल्हापूरच्या नव्या वैभवाची ओळख बनतील, असा विश्वास बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
कोल्हापूर शहरात उंच इमारती तर येतीलच त्या सोबतच स्मार्ट अमेनिटीज, हरित परिसर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सुरक्षितता यांसारख्या सुविधांनी युक्त गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या वाढत आहे. ग्राहकांची खरेदी क्षमता वाढली असून, शहरात कोटी रुपये किमतीच्या घरांचीही निर्मिती होऊ लागली आहे. 2019 आणि 2021 च्या महापुरानंतर कोल्हापूरकरांच्या घर खरेदीच्या मानसिकतेत झालेला बदलही या स्थित्यंतराला हातभार लावत आहे. पूर्वी स्वतंत्र बंगल्यांना पसंती देणारे कोल्हापूरकर आता सुरक्षित, उंच भागातील आणि हाय-राईज इमारतींमधील सदनिकांना प्राधान्य देत आहेत. रंकाळा, शाहूपुरी, कसबा बावडा यांसारख्या उंच व सुरक्षित भागातील प्रकल्पांना विशेष मागणी आहे.
कोल्हापुरातील बदलते शहरीकरण आणि लोकांची बदलती जीवनशैली या दोन्ही बाबींचा विचार करून नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची आखणी होत आहे. त्यामुळे हे क्षेत्र गुंतवणूकदारांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. केवळ स्थानिकच नव्हे, तर पुणे, मुंबई येथे स्थायिक झालेले मूळचे कोल्हापूरचे नागरिक, तसेच सावंतवाडी, सिंधुदुर्ग, कणकवली या भागातील नागरिक मुलांच्या शिक्षणाची सोय आणि निवृत्तीनंतर स्थायिक होण्यासाठी कोल्हापुरात घर खरेदीला पसंती देत आहेत.
गेल्या काही वर्षांत जमिनीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. 2007 मध्ये प्रतिचौरस फूट सुमारे 1800 ते 2200 रुपये असलेला फ्लॅटचा दर आज शिवाजी पार्क, ताराबाई पार्क, राजारामपुरी यासारख्या भागात 7 ते 10 हजार रुपये प्रतिचौरस फुटांवर पोहोचला आहे. कदमवाडी, कसबा बावडा येथे हा दर 4 ते 6 हजार रुपये आणि फुलेवाडी, कळंबा यासारख्या भागात 3 ते 4 हजार रुपये प्रतिचौरस फूट आहे. यावर्षी रेडिरेकनरचे दर वाढले असले, तरी घरांची उपलब्धता चांगली असल्याने दर स्थिर आहेत.