

कोल्हापूर : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ‘आयपीएल’च्या 18 व्या मोसमातील अंतिम सामना जिंकताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात विराट कोहलीच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मंगळवारी रात्री सामना संपताच ‘आरसीबी’च्या जर्सी, झेंड्यांसह चाहत्यांचा मोठा जमाव एकवटला. ‘आरसीबी... आरसीबी... विराट कोहली जिंदाबाद!’ अशा घोषणा देत तरुण शिवाजी चौकात दाखल होत होते. मात्र, पोलिसांनी जमावाला पांगवले. यानंतर गल्ली बोळामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत कोल्हापुरातील विराटप्रेमींनी ‘आरसीबी’च्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.
‘आरसीबी’ मॅच जिंकताच शहरातील कानाकोपर्यातून दुचाकींवरून तरुण शिवाजी चौकात दाखल होत होते. गर्दी होऊ लागताच पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवला. त्यानंतर शहरातील चौकाचौकांत चाहत्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. हातात झेंडे आणि ‘आरसीबी’ची जर्सी घेऊन तरुण- तरुणी दुचाकींवर नाचत होते. काहींनी विराटच्या पोस्टर्सना हार घातले, कोणी सेल्फी घेत होते, तर कोणी मोबाईलवर लाईव्ह करत होते. याशिवाय फटाके खरेदी करण्यासाठीदेखील तरुण-तरुणींची गर्दी होती.