

पूनम देशमुख
कोल्हापूर : जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्यसेवेला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीय बाल आरोग्य योजनेतून 700 पेक्षा अधिक हृदय, तर 15 हजारांहून अधिक बालकांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रियांसाठी येणारा सर्व खर्च शासन उचलत असल्याने कुटुंबांवरील मुलांच्या शस्त्रक्रियेसाठीचे आर्थिक ओझे हलके झाले आहे. चालू वर्षात 78 लहानग्यांची जटिल हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे, तर 1,917 इतर शस्त्रक्रिया 0 ते 18 वयोगटांतील मुलांवर करण्यात आल्या आहेत.
राज्यात एप्रिल 2013 पासून राष्ट्रीय बालआरोग्य योजना (आरबीएसके) राबवली जात आहे. यामध्ये 0 ते 18 वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ही योजना प्रभावी ठरत आहे. अंगणवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी करून जन्मजात हृदयातील छिद्र, व्हॉल्व्ह बंद असणे, निळेपणाचा दोष यांसारख्या गंभीर आजारांचे निदान करून आवश्यक शस्त्रक्रिया तातडीने केल्या जातात. तसेच, विविध अवयवांतील उणिवा, विकासातील वाढीचा अभाव व इतर आजारांवरही उपचार व शस्त्रक्रिया करून भविष्यातील गुंतागुंत टाळली जाते. यामुळे कुपोषण कमी करण्यास तसेच बालमृत्यूदर घटवण्यासही मदत होते आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय बालआरोग्य योजनेंतर्गत शहर व ग्रामीण भागातील बालक व मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक, जिल्हा कार्यक्रम सहायक व सांख्यिकी अन्वेषक यांचा समावेश असतो. तसेच, शहर व ग्रामीण स्तरावर 42 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी (स्त्री आणि पुरुष प्रत्येकी 1), औषधनिर्माता आणि परिचारिका यांचा समावेश असतो.
योजना अशा प्रकारे राबविली जाते
प्रत्येक वर्षी अंगणवाडीतील बालकांची दोनदा, तर शालेय
मुलांची एकदा आरोग्य तपासणी
किरकोळ आजारांवर शाळेतच त्वरित उपचार
गंभीर आजारांचे निदान झाल्यास जिल्हा रुग्णालयाद्वारे
पुढील उपचार व पाठपुरावा
गरजेनुसार राज्याबाहेरील तज्ज्ञ रुग्णालयांतही मोफत शस्त्रक्रिया