Vishalgad Riots Case | विशाळगड दंगलीतील प्रमुख संशयित रवींद्र पडवळला अटक

कोण आहे रवींद्र पडवळ?
Ravindra Padwal Arrested in Vishalgad Riots Case
Vishalgad Riots Case | विशाळगड दंगलीतील प्रमुख संशयित रवींद्र पडवळला अटक
Published on
Updated on

विशाळगड/सरूड : विशाळगड येथे जुलै 2024 मध्ये झालेल्या दंगलीतील प्रमुख संशयित रवींद्र दिलीप पडवळ (रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) याला शाहूवाडी पोलिसांनी बुधवारी अटक केली.

पडवळ हा समस्त हिंदू बांधव महाराष्ट्र राज्य या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असून, दंगलीचा तो मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याला शाहूवाडी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सिराज कासम प्रभूलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली. पडवळ हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. शाहूवाडी पोलिस पाच दिवस त्याच्यावर पाळत ठेवून होते. मंगळवारी मध्यरात्री त्याला ताब्यात घेण्यात आले.

पडवळच्या अटकेमुळे तपासाला मिळणार गती

विशाळगड येथे झालेल्या दंगलप्रकरणी मुख्य सूत्रधार रवींद्र पडवळ याला अटक केल्यानंतर तपासाला गती मिळणार आहे. ‘चलो विशाळगड’ अशी हाक दिल्यानंतर झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप त्याच्यावर पोलिसांनी ठेवला आहे. राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा देत 14 जुलै रोजी ‘चलो विशाळगड’ची शिव भक्तांना हाक दिली होती. याला अनुसरून पोलीस प्रशासनाने आदल्या दिवशी 13 जुलैपासूनच गडाच्या पायथ्याला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता, तरीही हजारो शिवभक्त आंदोलकांनी विशाळगडाकडे कूच केली होती.

फिर्यादी व पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हिंदुत्ववादी संघटनेच्या अनेक आंदोलकांकडून विशाळगडावरून माघारी निघाले असताना गजापूर येथे येताच मोठमोठ्याने घोषणा देत, आरडाओरडा आणि दंगा करीत हातात लोखंडी पहार, घन, टिकाव, काठ्या घेऊन विशिष्ट समाजाच्या घरांवर हल्ला चढवण्यात आला. आंदोलकांनी काही घरांची, वाहनांची तोडफोड नासधुस तर केलीच शिवाय घरातील गॅस सिलेंडर सुरु करून घरे पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. अतिक्रमणमुक्ती आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागल्यामुळे स्थानिक नागरिकांना घरे सोडून देत जीवाच्या आकांताने सैरावैरा जंगलात मुलाबाळांसहा पळून जावे लागले होते. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर, मुसलमान वस्तीत दगडफेक, तोडफोड करण्यात आली होती. यामध्ये राहती घरे, दुकानांसह मशिदीला लक्ष्य करत आंदोलकांनी प्रचंड नासधूस केली. यानंतर शाहूवाडी पोलिसांनी हिंसाचार प्रकरणात तब्बल 450 ते 500 आंदोलकांवर विविध (एकूण पाच गुन्हे) कलमांन्वये गुन्हे दाखल केले. या आरोपींपैकी 25 जणांना अटक करण्यात आली होती.

पडवळ प्रमुख आरोपी कसा?

दरम्यान, शाहूवाडी पोलिसांनी न्यायालयाला सादर केलेल्या अर्जात रवींद्र पडवळ हा दंगलीचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि चिथावणीखोर भाषण करून दंगल घडवून आणली, असा पोलिसांचा दावा आहे. या घटनेमुळे दोन समाजांत जातीय तेढ निर्माण झाली. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते. दंगलग्रस्त नागरिकांच्या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने प्रशासनाची कान उघडणीही केली होती.

पोलीस कोठडीची कारणे

शाहूवाडी पोलिसांनी पडवळ याला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करून 7 दिवसांची कोठडी देण्याची विनंती न्यायमूर्तींकडे केली. यामध्ये गुन्हा घडवण्यामागील नेमका हेतू आणि कटकारस्थानाचा सखोल तपास करणे, दंगलीत वापरलेली हत्यारे कोठून आणली याचा शोध घेणे, चोरलेली रोकड आणि दागिन्यांची माहिती मिळवून ते हस्तगत करणे, दंगलीत सहभागी असलेले इतर सहआरोपी व त्यांच्या साथीदारांची नावे आणि माहिती मिळवणे, गुन्ह्याचा प्रकार एखाद्या सामाजिक षडयंत्राचा भाग आहे का, याचा तपास करणे, आरोपी पडवळ हा फरार काळात नेमका कुठे होता आणि त्याला कोणी मदत केली, याची माहिती मिळवणे, या कारणांचा समावेश आहे.

अटक आणि पुढील कार्यवाही

दंगलप्रकरणी आतापर्यंत 25 जणांना अटक करण्यात आली असून, ते जामिनावर मुक्त आहेत; मात्र रवींद्र पडवळ हा सुरुवातीपासून फरार होता. त्याने कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता; पण तो फेटाळण्यात आला. अखेर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेमुळे दंगलीच्या तपासाला गती मिळेल, अशी दंगलग्रस्त नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कोण आहे पडवळ?

रवींद्र पडवळ हा पुण्यातील हिंदू बांधव समितीचा अध्यक्ष आहे. 14 जुलै रोजी विशाळगडावर जमावबंदी होती, तरीही विशाळगडावर येण्यासाठी त्याने तरुणांना आवाहन केले होते. त्यानुसार अनेक कार्यकर्ते गेले होते. त्यावेळी जमावाला चिथावणी देऊन दंगलीला कारणीभूत ठरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी दंगलीसह दरोड्याचेही गुन्हे दाखल आहेत. बंडा साळोखेसह पडवळ याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी साळोखे याला जामीन मंजूर झाला आहे; मात्र या घटनेपासून पडवळ गायब झाला होता. अद्याप तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर पोलिसांनी त्याच्या घरातूनच त्याला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news