

कागल : महायुतीचे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. कागल येथे आयोजित प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला माजी खासदार सुजय विखे-पाटील, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, दोन्ही मतदारसंघांतून महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजय होतील. उमेदवारांच्या नावासमोर असलेल्या चौकोनात पसंती क्रमांक एकचे मतदान करावे. शरद लाड आणि भैया माने या दोघांनी चांगली मतदारांची नोंदणी केली होती. दोघांनीही महायुतीला पाठिंबा पूर्ण दिला आहे. तन, मन, धनाने ते पाठीशी आहेत, त्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत. कागलचे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत. जास्तीत जास्त मतदान करावे.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कागलची परंपरा देशांमध्ये उच्चांकी मतदान करणारी आहे. गेल्या पाच निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेले आहे. या निवडणुकीतही उच्चांकी मतदानाची परंपरा अबाधित ठेवून डॉ. स्मिता जाधव यांना पहिल्या महिला पदवीधर आमदार म्हणून निवडून आणण्याचा इतिहास घडवा.
कौस्तुभ गावडे हे तरुण शिक्षकांचे नेते आहेत. त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणणे ही आपली परीक्षा आहे. मतदारांच्या भेटी घ्या. त्यांना केंद्रावर आणा. मतदान करून त्यांना सुरक्षित सोडा. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर दिवसभर तळ ठोकून थांबणार आहे. कार्यकर्त्यांनी कोणतीही कसूर न ठेवता मतदान करावे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. भैया माने यांनी संपूर्ण पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेली आहे. डॉ. स्मिता जाधव यांनी दिलेली नऊ वचने पूर्ण करण्याकरता आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि प्रश्न सोडवणाऱ्या पहिल्या पदवीधर महिला म्हणून त्या विजयी होतील, असे ते म्हणाले. सुजय विखे-पाटील म्हणाले, भैया माने यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीची निवडणूक सोपी झाली आहे. त्यांच्या त्यागाचा वाटा मोठा आहे. निवडणुकीत अचानक थांबणे मोठे आव्हानाचे काम होते; मात्र भैया माने यांनी थांबून विचाराला पाठिंबा दिला. ना. मुश्रीफ यांच्यासारखा जाणता नेता शोधूनही सापडणार नाही. त्यांना छोट्या-मोठ्या गोष्टीचा धक्क्याचा फरक पडत नाही. काळ बदलत असतो. वादळात घाबरून न जाता खंबीरपणे उभे राहावे. रात्रीची चिंता सोडा. दिवसाची चिंता करा. सक्षम पर्याय म्हणून दोन्ही उमेदवारांना विजयी करा.
विकास पाटील यांनी स्वागत केले, तर विजय काळे यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्षा सविता माने, चंद्रकांत गवळी, गोकुळचे माजी संचालक युवराज पाटील, माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ, शशिकांत पाटील, सतीश पाटील, बळवंत माने, प्रकाश गाडेकर, सौरभ पाटील, दिनकर कोतेकर, बिपिन माने, देवानंद पाटील, प्रवीण भोसले, रंगराव पाटील, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश सलवादे, मनोज फराकटे, उपसभापती इंद्रजित पाटील, प्रवीण काळबर, नवल बोते, डी. ए. चौगुले आदी उपस्थित होते. संजय चितारी यांनी आभार मानले.
मीच उमेदवार आहे, असे समजून मतदान करा : भैया माने
भैया माने म्हणाले, मीच उमेदवार आहे असे समजून मतदान करा. आपण केलेली मतदार नोंदणी, त्यांचे मतदान करून घेणे ही आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी उच्चांकी मतदान करून पार पाडूया. डॉ. स्मिता जाधव यांना इर्षेने मतदान करून विजयी करूया.