

कोल्हापूर : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे. मतदारांशी थेट संपर्क साधून मतदानासाठी प्रयत्न करावेत आणि बूथस्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जिल्हा कार्यालयात चव्हाण यांच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक बूथवरील जबाबदारी निश्चित करणे, मतदारांपर्यंत पोहोचणे आणि नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करणे, यावर त्यांनी भर दिला.
मतदान केंद्रांची रचना, बूथनिहाय कार्यकर्त्यांची नियुक्ती, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक व्यवस्था यांचा आढावा घेण्यात आला. केवळ नियोजन करून न थांबता प्रत्येक जबाबदारीचा नियमित आढावा घेऊन कामाचा परिणाम दिसला पाहिजे, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.
प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी मतदान केंद्रांची माहिती देऊन निवडणूक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. मतदारांशी किमान दोन ते तीन वेळा संपर्क साधणे, मतदार याद्यांचा आढावा घेणे आणि बूथस्तरावरील समन्वय मजबूत करण्यावर भर देण्यात आला. बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या कार्यकर्त्यांशी समन्वय राखण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, कृष्णराज महाडिक, राहुल चिकोडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.