

Rajesh Kshirsagar Video Controversy
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी एका कथित व्हिडिओच्या माध्यमातून आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार क्षीरसागर यांच्याविरोधात आरोपांची सरबत्ती केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर हे काही कंत्राटदारांकडे आर्थिक मागणी करत असल्याचे दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. संबंधित प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
याचबरोबर, कथित प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आमदार राजेश क्षीरसागर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी तसेच त्यांचे आमदारपदही रद्द करण्यात यावे, अशी मागणीही इंगवले यांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. तसेच व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओची सत्यता किंवा त्यातील दाव्यांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.