

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शनिवारी रत्नागिरी हापूस आंबा दाखल झाला. येथील ओम ट्रेडर्स या आडत दुकानात सकाळी दहा वाजता आंब्याचा पहिला सौदा पार पडला. रत्नागिरीतील बेर्डे या शेतकऱ्याकडून पाच पेट्यांची आवक झाली. आकाश तोडकर या व्यापाऱ्याकडे आलेल्या 15 नग आंब्याची पहिली पेटी प्रसाद वळंजू यांनी 6,021 रुपयांना खरेदी केली. 4,500 रुपयांपासून बोलीला सुरुवात झाली.
यंदा हवामान बदलाचा आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. यावर्षी फुलोरा मोठ्या प्रमाणात आला होता; परंतु अपेक्षित फळधारणा न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. मात्र, हंगामातील पहिला आंबा शनिवारी रत्नागिरीहून कोल्हापुरात दाखल झाला. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने दरामध्ये तेजी राहण्याची शक्यता असल्याचे येथील फळ व्यापारी वळंजू यांनी सांगितले.
कोल्हापूर बाजार समितीत आवक झालेल्या रत्नागिरी हापूसच्या 5 पेटीपैकी एका पेटीला 6,021 रुपये इतका भाव मिळाला. यामुळे आंबा बागायदारांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामात आंब्याची आवक उशिरा झाली आहे. गत हंगामात फेबुवारीच्या सुरुवातीपासूनच आंब्याची चांगली आवक सुरू झाली होती. मात्र यंदा फेबुवारी अखेरीस आंब्याची आवक झाली आहे. एप्रिल मध्यानानंतर आंब्याचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात येणार आहेत.