

चिपळूण : राज्यभरातील टीडब्ल्यूजेच्या गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. शेअर मार्केटच्या नावाखाली या कंपनीकडून मोठा परतावा देण्याचे आमीष दाखवून करोडोंची गुंतवणूक करण्यात आली. आता मात्र परतावा वेळेत मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून राज्यातील ठिकठिकाणाहून अनेक गुंतवणूकदार आपल्या तक्रारी पोलिसांत दाखल करीत आहेत. त्यामुळे ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. दुसर्या बाजूला संबंधित कंपनीच्या संचालक, व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल होत असताना कंपनी व्यवस्थापनाकडून मात्र अजूनही प्रतीक्षा करा, असे भावनिक आवाहन देखील केले जात आहे.
चिपळूणवासीयांसह जिल्हाभरात गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून अनेक कंपन्यांनी गंडा घातला आहे. यामध्ये कल्पतरू, ईडू, संचयनी, जश्न लाँड्री, अर्न इंडिया, पर्ल्स ग्रीन, पॅगोडा फॉरेस्ट, ट्विंकल, संजीवनी, पॅन कार्ड, कडकनाथ, शाईन इंडिया अशा विविध कंपन्यांनी कोट्यवधीची फसवणूक केलेली आहे. कमी वेळेत झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून जिल्ह्यातील अनेक लोकांनी या कंपन्यांमध्ये आपले पैसे गुंतविले. दामदुप्पट पैसे मिळतील म्हणून या कंपन्यांकडे लोक आकर्षिले गेले; मात्र काही कालावधीनंतर मुद्दलदेखील मिळेनासी झाल्याने लोकांची करोडोंची फसवणूक झाली. हे अनुभव असताना देखील पुन्हा एकदा जिल्ह्यातील 2018 पासून टीडब्ल्यूजे कंपनीने आपले बस्तान मांडले आणि प्रतिलाख प्रतिमाह 7 टक्क्यांपासून आता तीन ते चार टक्क्यांपर्यंत परतावा देतो असे सांगून करोडोंची गुंतवणूक करून घेतली. विशेष म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांचा समावेशआहे. अनेक निवृत्तीधारकांचे पैसे टीडब्ल्यूजेमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांचे पुढील आयुष्य अडचणीत आले आहे. ही गुंतवणूक राज्यभरात सुमारे दीड हजार कोटींहून अधिकची असू शकते असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
यामध्ये शासकीय कर्मचारी, पोलिस, वकील, डॉक्टर, इंजिनियर आणि निवृत्त कर्मचारी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवून अडकले आहेत. सुरुवातीला लोकांचा विश्वास बसावा म्हणून या कंपनीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले व त्याला प्रायोजक म्हणून पुढाकार घेतला. ग्रंथालये, साहित्यिकांच्या मुलाखती, पाणी अडवा-पाणी जिरवा, वृक्षारोपण, विविध स्पर्धा अशा माध्यमातून समाजात रूजण्याचा प्रयत्न केला व त्यातून माणसे हेरून त्यांच्याकडून गुंतवणूक करवून घेतली. आता मात्र ठिक़ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत. चिपळूणकर अनेकवेळा अशा कंपन्यांच्या नादाला लागले आणि आर्थिक अडचणीत आले. याची अनेक उदाहरणे आहेत. ईडू व अर्न इंडियानंतर चिपळूणवासीयांसह जिल्हावासीय यातून धडा घेतील अशी अपेक्षा होती; मात्र पुन्हा एकदा टीडब्ल्यूजेने कावा साधल्याची चर्चा नागरिकांसह ठेवीदारांमध्ये सुरू आहे.