

कोल्हापूर : सीपीआरमधील हृदय शस्त्रक्रिया विभागात 45 वर्षीय रुग्णाला ‘रप्चर्ड सायनस ऑफ वॉल्साल्वा टू राईट व्हेंट्रिक्युलर आऊटफ्लो ट्रॅक्ट’ या हृदयासंबंधीच्या दुर्मीळ आजाराचे निदान झाले होते. त्यामुळे हृदयाला गंभीर धोका निर्माण झाला होता. सीपीआरच्या वैद्यकीय पथकाने रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले. बुधवारी संबंधित रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याच्या हृदयाची तपासणी केली असता महाधमनीचा काही भाग फुटून हृदयाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे कार्डिओलॉजी पथकाने तातडीने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने अत्याधुनिक इमेजिंगच्या मदतीने 22 मिमीचे क्लोजर डिव्हाईस बसवून रक्तवाहिनीतील फाटलेला भाग पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे रुग्णाची प्रकृती त्वरित स्थिर झाली. ही शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्यात आली.
कार्डिओलॉजी विभाग प्रमुख अक्षय बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे यांचे विशेष सहकार्य लाभले. वैद्यकीय पथकात भूलतज्ज्ञ डॉ. उल्हास मिसाळ, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. वनिता परितेकर, डॉ. राज द्विवेदी, डॉ. स्फूर्ती जाधव, डॉ. विदूर कर्णिक, डॉ. अजित हांगे, डॉ. अदीब शेख, डॉ. निखिल गडदे, डॉ. बी. पाटील, तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे, उदय बिरांजे, वैष्णवी राजेंद्र यांचा समावेश होता.