

कोल्हापूर : पश्चिम घाटमाथ्यावर पसरलेल्या सह्याद्रीच्या जंगलांमध्ये शेकडो वनौषधींचे अस्तित्व आढळून येत होते; मात्र नवीन महामार्ग, जंगलातील खाणी, चोरटी जंगलतोड आणि तस्करीमुळे अनेक वनौषधी जवळजवळ नामशेष झाल्या आहेत. वन खात्यासह प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात असलेल्या जंगलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 1800 वनस्पती आढळून येतात. त्यापैकी जवळपास 315 वनस्पती या वनौषधी असून त्यातील बहुतेक सगळ्या वनस्पतींचे अस्तित्व कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलांमध्ये आढळून येत होते; मात्र अलीकडील काही वर्षांत काळी हळद, चित्रक, अश्वगंधा, शतावरी, पारिंगा, मधुमालती, विष्णुकांत यासह सुमारे 50 हून अधिक वनौषधी दुर्मीळ किंवा नामशेष झाल्या असल्याचे त्या भागातील नागरिकांमधून सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे काळाच्या ओघात या वनौषधींचा वापर आणि त्याबाबतची माहिती अस्तंगत झाल्यात जमा आहे.
सध्या नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. या कामासाठी उभ्या डोंगर रांगा कापण्यासह मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. कोल्हापूरपासून रत्नागिरीपर्यंत अनेक औषधी वनस्पती आढळून येत होत्या; मात्र महामार्गासाठी सुरू असलेल्या या जंगल संहारात अनेक औषधी वनस्पती नामशेष होताना दिसत आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षीत आणि अतिसंरक्षित क्षेत्रात सध्या अनेक कायदेशीर आणि बेकायदेशीर खाणी सुरू आहेत. वनसंहाराचा कोणताही विधीनिषेध न बाळगता सुरू असलेल्या या खाण कामांमुळे, तर वनौषधींची अक्षरश: कत्तल सुरू आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही वन खाते आणि जिल्हा प्रशासन त्याकडे कानाडोळा करताना स्पष्टपणे दिसत आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकसह देशाच्या वेगवेगळ्या भागांतील वैदू मंडळी आणि वनौषधींची माहिती असलेली मंडळी या भागात येऊन वर्षाकाठी लाखो रुपयांच्या वनौषधी गोळा करून घेऊन जाताना दिसतात; मात्र या वनौषधींची नव्याने लागवड होत नसल्याने अनेक वनौषधी दुर्मीळ किंवा नामशेष झाल्या आहेत.
अडुळसा : खोकला, अश्वगंधा : शक्तिवर्धक, मरवा : चर्मरोग व पोटदुखी, टाकळा : अर्धशिशी, गंडमाळा, निरगुडी : वात, पाय मुरगळणे, रुई : पोटदुखी, कुष्ठरोग व न्यूमोनिया, रिंगण : नागीन, पारिंगा : जखम भरणे, पानफुटी : मधुमेह, माका : केशवर्धन, आतड्याचे विकार व लिव्हर सूज, कोरफड : त्वचा व केशविकार, कडुनिंब : बहुगुणी, जास्वंद : केशवर्धक, गुंज : खोकला, मधुमालती : कुष्ठरोग, सांधेदुखी व त्वचाविकार, बेल : आतड्याचे विकार, बोर : वात, पित्त आणि कफ, धोतरा : मूळव्याध व मूतखडा, तुळस : अपचन व पोटदुखी, आघाडा : अतिसार, बद्धकोष्ठ, शमी : जुलाब व दमा, केवडा : डोकेदुखी व पोटदुखी, रानवांगी : दमा व पोटदुखी, कण्हेर : विंचवाचा दंश, आपटा : वात, पित्त व कफ, अर्जुनसारडा : हाडे सांधणे व जखमा भरणे, विष्णुकांत : अल्सर, कावीळ व मधुमेह, देवदार : चर्मरोग व पोटदुखी, पिंपळ : तोतरेपणा व त्वचाविकार.