

कोल्हापूर : शिपाई शांततेसाठी लढतो. यामुळे त्याला शांततेचा अर्थ कळतो. या भावनेतून शिवछत्रपतींचा वारसा जपत देश व नागरिकांच्या रक्षणासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार्या पद्मश्री, लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. तथा शंकरराव पांडुरंग पाटील-थोरात यांच्या शौर्याने अवघे भारावले. जनरल थोरात यांच्या तब्बल 37 वर्षांच्या लष्करी प्रवासावर प्रकाशझोत टाकणार्या दुर्मीळ प्रदर्शनाचा खजिना शनिवारी खुला झाला. निमित्त होतं जनरल थोरात यांच्या लष्करी कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणार्या प्रदर्शनाचे!
राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथील कला दालनात या प्रेरणादायी प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी खा. शाहू महाराज, 109 टी. ए. मराठा बाटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी. के. कल्लोली व कर्नल विजयसिंह गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या मार्गदर्शिका सौ. संयोगीताराजे, सौ. श्रृती कल्लोली यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात व प्रदर्शनाच्या संकलक सौ. उषा थोरात यांनी स्वागत केले.
उद्योजक व्ही. बी. पाटील, आर. ए. तथा बाळ पाटणकर, ऋतुराज इंगळे, प्रसाद कामत, जय कामत, आर्कि. अमरजा निंबाळकर, लेखिका सौ. नंदिता घाटगे, मेजर डॉ. रूपा शहा, अनुराधा बोस, मराठा महासंघाचे चंद्रकांत चव्हाण, देवल क्लबचे श्रीकांत डिग्रजकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी मान्यवरांसह उपस्थितांना डॉ. यशवंत थोरात व सौ. उषा थोरात यांनी प्रदर्शनासंदर्भातील माहितीपट दाखवून आवश्यक माहिती दिली.
प्रदर्शनात थोरात यांच्या 37 वर्षांच्या लष्करी सेवेचा इतिहास एकवटला आहे. या कालावधीतील विविध आठवणी, दुर्मीळ छायाचित्रे, अनमोल वस्तू आणि दस्तावेजातून लोकांसमोर मांडण्यात आल्या आहेत. जन्मभूमी (दि. 12 ऑगस्ट 1906) शाहूवाडी तालुक्यातील वडगावपासून ते इंग्लंडमधील लष्करी शिक्षणापर्यंतच्या (1924) प्रवासानंतर सीमावर्ती सेवा आणि दुसरे महायुद्ध (1927 ते 1945), फाळणी- स्वातंत्र्य आणि कोहिरयन मोहीम (1947 ते 1954), इस्टर्न कमांड व रणनैतिक दूरद़ृष्टी (1957 ते 1961) इथपासून ते 1961 ची सेवानिवृत्तीपर्यंतच्या (रिट्रीट) कारकिर्दीच्या माहितीचा यात समावेश आहे.
या कालावधीतील त्यांना मिळालेली 1946 च्या दुसर्या महायुद्धातील कामगिरीबद्दल बि—टिश सैन्यातील दुसरे सर्वोच्च शौर्य पदक व 1953 ला कोरिया युद्धातील विशेष कामगिरीबद्दल अशोक चक्र व पद्मश्रीने सन्मान यासह विविध पदके, गौरव व मानपत्रे प्रदर्शनाचे आकर्षण आहे.
याच बरोबर करवीर छत्रपतींनी दिलेल्या झुंजारराव व सरदार किताबांच्या सनदा, तलवारी आणि जपानी सैन्याच्या अधिकार्याला गोळी घालून मिळविलेली समुराई तलवारीसह अनेक दुर्मीळ वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन रविवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
ले. ज. थोरात यांच्या ‘माझी शिपाईगिरी’ या पुस्तकाच्या सुधारित व विस्तारित मराठी आवृत्तीचे प्रकाशन रविवारी (दि. 12) सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि लष्करी विषयांचे प्रसिद्ध लेखक जनरल शशिकांत पित्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.