

संतोष बामणे
जयसिंगपूर : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील प्राचीन श्री कोपेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान मातीचे उत्खनन करताना प्राचीन शिल्पांचा दुर्मीळ ठेवा सापडला. यामध्ये नंदीची मूर्ती, बालकाला कडेवर घेतलेल्या स्त्रीचे सुबक कोरीव शिल्प आणि बुद्धसदृश मुखाकृती असलेल्या मूर्तीचा समावेश आहे. यामुळे पुन्हा खिद्रापूरच्या ऐतिहासिक वारशाला बळ मिळाले आहे.
उत्खननातून बाहेर पडलेले हे मौल्यवान अवशेष सध्या मंदिर परिसरात उघड्यावरच ठेवले आहेत. खिद्रापूरसह परिसरातील नागरिकांची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. सर्व शिल्पांचे तातडीने अधिकृत छायाचित्रण, मोजमाप व पुरातत्त्वीय परीक्षण करावे. हे सर्व अवशेष तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांची नोंद दफ्तरी घेण्याची गरज असून पुढील सर्व उत्खनन काम पुरातत्त्वतज्ज्ञांच्या प्रत्यक्ष देखरेखीखालीच पार पाडावे. कोपेश्वर भूमीत सापडलेला हा शिल्पठेवा नेमका कोणत्या कालखंडातील व कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे, हे तज्ज्ञांच्या सखोल अभ्यासानंतरच स्पष्ट होईल. परंतु, तोपर्यंत या ऐतिहासिक वारशाचे रक्षण करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.
दरम्यान, इतका महत्त्वाचा ऐतिहासिक व पुरातत्त्वीय ठेवा हाती लागूनही उत्खननस्थळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधिकारी अथवा जबाबदार अभियंता प्रत्यक्ष उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे या शिल्पांबाबत अजून नेमकी माहिती मिळत नाही. योग्य मार्गदर्शनाअभावी सुरू असलेल्या या कामामुळे प्राचीन अवशेषांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
माती काढताना आढळल्या मूर्ती
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) अधिपत्याखाली कोपेश्वर मंदिराच्या विकासकामांना सुरुवात झाली आहे. यांतर्गत मंदिराची संरक्षक भिंत बांधणे, पाथवे तयार करणे, मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे तसेच मंदिराच्या संरचनात्मक सुरक्षिततेसाठी स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरू आहे. यातील संरक्षक भिंती परिसरातील माती काढत असताना या मूर्ती आढळून आल्या आहेत.
माती उत्खनन करताना प्राचीन शिल्पे आढळली आहेत. यावर अत्यंत सूक्ष्म कलाकुसर आहे. या परिसरात आणखी ऐतिहासिक अवशेष दडलेले असण्याची दाट शक्यता आहे. या शिल्पांचे तातडीने अधिकृत छायाचित्रण, मोजमाप व पुरातत्त्वीय परीक्षण करावे.
असिफ कागवाडे, इतिहासप्रेमी, खिद्रापूर