

Ramdas Athawale Kolhapur Speech
कोल्हापूर : 'पुढारी'चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापुरात सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. अनेक मोठे नेते घडवण्यात ‘पुढारी’चा वाटा आहे, असं गौरवोद्गार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी कोल्हापूरमध्ये काढले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका मी 2006 मध्ये ‘पुढारी’ला दिलेल्या मुलाखतीत मांडली होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज (5 नोव्हेंबर) 80 वा वाढदिवस आहे. यानिमित्त कोल्हापूरमधील पोलिस परेड ग्राऊंडवर सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा तसेच 'सिंहायन' या आत्मचरित्राचे प्रकाशन पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा पार पाडला. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सोहळ्यात प्रतापसिंह जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत रामदास आठवलेंनी खास त्यांच्या शैलीत कविताही सादर केली. 'मी होतो ज्यांचा मित्र, त्यांचं बदलतय चित्र. मी पूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत होतो. आता मी मोदींसोबत आहे. लोकसभा निवडणुकीत शिर्डीत पराभव झाल्यानंतर शरद पवारांनी राज्यसभेची ऑफर दिली होती. पण मी नकार दिला, कारण मला राज्यसभेत रहावं लागलं असतं. मला मंत्री होता आले नसते', असं आठवलेंनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
प्रतापसिंह जाधव आम्ही तुमच्यासोबत आहेत. आपण सर्वांनी मिळून कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करायचे आहेत, असंही आठवले यांनी आर्वजून नमूद केले. केंद्रात आमची सत्ता येत रहावी. जोपर्यंत नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत तोवर मी देखील मंत्री आहे, असंही आठवले म्हणाले.
राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. हैदराबाद गॅझेटला सरकारने मान्यता दिली पण यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असंही आठवलेंनी सांगितले.
प्रतापसिंह जाधव यांना उत्तम आरोग्य लाभू दे. त्यांनी वयाची शंभरी पूर्ण करावी अशा शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, ग. गो. जाधव यांचा वारसा बाळासाहेब जाधव पुढे नेत आहेत. पिता- पुत्रांना पद्मश्री मिळणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रतापसिंह जाधव यांचा गौरव करताना आनंद वाटतो. ‘पुढारी’ केवळ वृत्तपत्र नाही ती संस्था असून पुढारीने अनेक प्रश्न उचलून धरले. ‘पुढारी’ला कोणी धक्का लावू शकत नाही, असं अजित पवारांनी सांगताच कोल्हापूरकरांनी टाळ्यांचा कडकडाट केला.