

कोल्हापूर : श्रीरामाच्या पराक्रमाच्या वर्णन गीताने दुमदुमलेले सूर, पारंपरिक लवाजमा, शाही थाट, फुलांची उधळण, साखरमाळांचे तोरण लावून सजवलेल्या रथात प्रतिष्ठापित केलेल्या राम, सीता आणि लक्ष्मणच्या उत्सवमूर्ती अशा मंगलमय वातावरणात रविवारी रात्री अंबाबाई मंदिरात राम रथोत्सवाची मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे प्रथेनुसार या रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार शाहू महाराज, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, अंबाबाई भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, ट्रस्टचे अॅड. राजेंद्र चव्हाण, प्रणिल इंगळे, प्रसन्न मोहिते, प्रताप घोरपडे, शुभम शिरहट्टी, दीपक म्हेत्तर आदींनी रथ ओढला. अंबाबाई मंदिरातील रामाचा पार येथे छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारीत राम मंदिर आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून या राम मंदिरात रथोत्सवाचे आयोजन केले जाते. आजही छत्रपती घराण्यामार्फत ही प्रथा जपली आहे. हा रथ हाताने ओढण्याची परंपरा आहे. रात्री नऊ वाजता राम रथोत्सवाला प्रारंभ झाला. आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट, पाकळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. रथोत्सवाच्या मार्गावर रांगोळ्यांची नक्षीदार सजावट करण्यात आली होती. छत्रपती घराण्याच्या वतीने रामाच्या रथाचे विधिवत पूजन करण्यात आले. आरती झाल्यानंतर रथाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. अंबाबाई मंदिरातून शाही लवाजम्याच्या थाटात या रथोत्सवाची नगर प्रदक्षिणा करण्यात आली.