

कोल्हापूर : भाजप धर्माच्या नावाने राजकारण करतो. राज्यातील अनेक देवस्थानी हत्ती बाळगण्याची परंपरा आहे; मात्र ही परंपरा, संस्कृती मोडीत काढीत आहेत. अशावेळी तुम्हाला राग येत नाही का? परंपरा मोडणार्यांना आवर घाला. आमच्या धार्मिक भावना दुखावणार असाल, तर याद राखा, असा इशारा माजी खा. राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. रविवारी काढलेल्या मूक पदयात्रेची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट सभेने झाली. यावेळी बोलताना पुढील आठवड्यात राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेट्टी म्हणाले, वनतारामध्ये सध्या 215 हत्तिणी आहेत, तरीदेखील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण आवडली. नांदणी येथील मठ 1200 वर्षे जुना आहे. येथे मंदिरात हत्ती बाळगण्याची परंपरा आहे; मात्र माधुरी हत्तिणीचा भीक मागण्यासाठी वापर केला जातो, असा आरोप पेटाने केला आहे; परंतु माधुरी हत्तिणीवर लाखो रुपयांचा खर्च केला आहे. कोल्हापूरने पाण्याचा महापूर पाहिला आहे; परंतु एका मुक्या प्राण्यासाठी पहिल्यांदा देशाने एवढा मोठा जनतेचा महापूर पाहिला.
माधुरी हत्तिणीचे नांदणीसह कोल्हापूरकरांशी द़ृढ नाते असल्याचे सांगून ते म्हणाले, केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बूज राखून माधुरीला जड अंत:करणाने निरोप दिला. त्यावेळी जीनसेन महाराजांसह अनेकांना अश्रू अनावर झाले. माधुरी हत्तिणीच्या डोळ्यांतूनही पाणी आले होते. उपाशी अवस्थेत ती वनतारामध्ये गेली. याची भरपाई करावी लागेल. रात्री उशिरा प्राण्यांना वाहून न नेण्याचा कायदा आहे. मग, रात्री बारा वाजता कोणत्या कायद्याने माधुरी हत्तिणीला नेण्यात आले. माधुरी आजारी होती असे पेटाचे म्हणणे आहे, तर पशुसंवर्धन अधिकारी ती ठणठणीत असल्याचे पत्र देतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पेटाने यापूर्वी दिलेल्या तक्रारीवर जोतिबावरील सुंदर हत्तीला जंगलात सोडण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. यास जबाबदार कोण, असा सवाल करीत आता कुंथुगिरी, रायचूर येथील हत्ती घेऊन जाण्याचे काम सध्या सुरू आहे. ते हाणून पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.
शिरोळ परिसरात हत्तीसाठी पोषक वातावरण आहे. उलट जामनगर येथे 47 डीग्री वातावरण राहायला चांगले नाही. या ठिकाणी अनेक हत्ती मृत्युमुखी पडले आहेत. ते काय माधुरी हत्तिणीचा सांभाळ करणार, असा सवाल यावेळी करण्यात आला.
माधुरी हत्तिणीला नेताना काही तरुणांकडून धक्काबुक्की झाली. याची जाहीर माफी मागितली आहे. कारवाईसाठी पोलिसांनी अगतिकता दाखवली, तर त्यापुढे होणार्या परिणामाला प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजप आमच्या धार्मिक भावनांचा विचार करणार नसेल, आम्हाला दुखावणार असेल, तर मुंबईत धडक मारू, महापालिका निवडणूकीमध्ये भाजपचे उमेदवार पाडा म्हणून भागाभागात प्रचार करू, असेही शेट्टी म्हणाले.
दत्तवाड येथे काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी 15 जणांचे लचके तोडले. कोल्हापुरातील बापट कॅम्पमध्येही असाच प्रकार घडला. पंचगंगा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडतात. अशावेळी नेमकी पेटा कुठे असते, असा सवाल शेट्टी यांनी केला.
पदयात्रेत सहभागासाठी पहाटे पाच वाजता गाव सोडलं... नांदणीपासून कोल्हापूरपर्यंत चालताना अन्नाचा कण खाल्ला नाही. दुपारी चार वाजेपर्यंत चालून पायाला फोड आले; पण आता थांबायचं नाही, असं ठरवलं आहे. माधुरी गावात नाही, सारं गाव सुन्न झालं आहे. माधुरी आमचा जीव होता. ती गेल्यापासून डोळ्याची धार थांबलेली नाही, अशा शब्दांत महिलांच्या भावना ओठावर आल्या. मूक पदयात्रेत सहभागी महिलांची अश्रू अनावर आणि कंठ दाटलेला अशी अवस्था होती. पदयात्रेत आठ-दहा वर्षांच्या शाळकरी मुलींपासून युवती, महिला, ज्येष्ठ महिलांनी लाडक्या माधुरीसाठी दिवसभर पायपीट केली. माधुरी गावात नाही, ही गोष्ट आम्हाला सहन होत नाही. काळजापासून इच्छा आहे की, माधुरी परत यावी. गावात, मठात असेपर्यंत तिला काहीही आजार नव्हता, तिची व्यवस्थित काळजी घेतली जात होती. आम्ही नांदणीपासून कोल्हापूरपर्यंत आलो आहोत. आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला नाही, तर माधुरीसाठी जीवाचं रान करणार, आणखी चालण्याचीही आमची तयारी आहे, असं म्हणताना नांदणीतील महिलांना हुंदका आवरला नाही.