Sugarcane Rate Demand : उसाला पहिली उचल ४५०० रुपये मिळालीच पाहिजे : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्‍हाभर मोटारसायकल रॅली
Raju Shetti
Raju Shetti Pudhari
Published on: 
Updated on: 

जयसिंगपूर : शेतकऱ्यांचा ऊस हा काही फुकटचा नाही. घामाची योग्य किंमत मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. चार दिवसांत कारखानदार आणि प्रशासनाने समाधानकारक तोडगा काढला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र व आक्रमक आंदोलन छेडेल. पहिली उचल ४५०० रुपये मिळालीच पाहिजे, अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामात प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांची अभूतपूर्व मोटारसायकल जनजागृती रॅली काढण्यात आली.

दिवसभरात तब्बल १८५ किलोमीटरचा टप्पा पार करणाऱ्या या रॅलीने संपूर्ण जिल्हा ढवळून काढला असून शेतकऱ्यांच्या या एकजुटीमुळे साखर कारखानदार व जिल्हा प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतली आहे. हातकणंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली. यामध्ये हजारो शेतकरी दुचाकीसह, हातात संघटनेचे झेंडे घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

ही रॅली हातकणंगले येथून सुरू होऊन कुंभोज, नरंदे, सावर्डे, वडगाव, वठार, वारणानगर, वाघबीळ, आसुर्ले पोर्ले, खुपिरे, सांगरूळ, सडोली खालसा, परिते, बिद्री, वाळवे, सिद्धनेर्ली आणि कागल या प्रमुख गावांमधून मार्गस्थ झाली. रॅलीच्या मार्गावरील प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी आणि महिलांनी ठिकठिकाणी रॅलीचे औक्षण करून आणि पुष्पवृष्टी करून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. कसबा सांगाव येथे या भव्य रॅलीची सांगता झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news