

कोल्हापूर : राजेश क्षीरसागर यांना 500 एकर जमीन देण्यासाठी बक्षीसपत्राच्या स्टॅम्पसह आपण आलो आहे. स्वत:ला धर्मात्मा म्हणवून घेणार्या राजेश क्षीसागर यांनी आमदार झाल्यापासून आजपर्यंत कमवलेली सर्व जंगम मालमत्ता आई अंबाबाईच्या चरणी दान करावी, असे प्रतिआव्हान माजी खा. राजू शेट्टी यांनी दिले. भर पावासात दोन तास शेट्टी यांच्यासह शेतकर्यांनी बिंदू चौकात ठिय्या मारला.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांची 500 एकर जमीन असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी ही 500 एकर जमीन क्षीरसागर यांच्या नावावर बक्षीस पत्र करण्यासाठी स्टॅम्पसह बिंदू चौकात आपण येतो. तुम्हीदेखील या, असे आव्हान क्षीरसागर यांना दिले होते. शनिवारी शेट्टी बक्षीसपत्र स्टॅम्पसह बिंदू चौकात कार्यकर्ते व शेतकर्यांसह बिंदू चौकात जमले होते. शेतकर्यांनी एकच लक्ष, शक्तिपीठ रद्द, 50 खोके एकदम ओके, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
आमदार क्षीसागर यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी त्यांच्या नावे बक्षीसपत्र करून ऐतिहासिक बिंदू चौकात आलो आहे. ते त्यांनी स्वीकारायला यायला हवे होते. मात्र, ते आले नाहीत. आ. क्षीरसागर यांनी प्रति-आव्हान स्वीकारले नसले तरी माझ्या घरी येऊन हा स्टॅम्प त्यांनी घेऊन जावा, असे शेट्टी यांनी सांगितले. आ. क्षीरसागर यांना देण्यासाठी आणलेल्या बक्षीसपत्राचे वाचन अॅड. सुरेश पाटील यांनी केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, विजय देवणे, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहराध्यक्ष सुनील मोदी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, अवधूत साळोखे उपस्थित होते.
राज्यात वेगवेगळ्या ठेकेदारांचे मिळून 90 हजार कोटी रुपये थकीत आहेत. शासनाकडे ठेकेदारांना द्यायला पैसे नाहीत. दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गासाठी 6 टक्क्यांनी मिळत असताना 9 टक्के व्याजदाराने सरकारने पैसे घेतले. यातूनच ठेकेदारांनी बिले द्यावीत, नाहीतर अनेक कंत्राटदार आत्महत्या करतील, त्याला शासन जबाबदार राहील, असे शेट्टी म्हणाले.