चंदगड ः पुढारी वृत्तसेवा
चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी महायुतीचे उमेदवार आ. राजेश पाटील यांनी शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आ. पाटील यांचा अर्ज दाखल करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, माजी खा. संजय मंडलिक, बाबासाहेब आसुर्लेकर उपस्थित होते. रवळनाथ देवालयाच्या पटांगणात झालेल्या जाहीर सभेत मंत्री मुश्रीफ म्हणाले, राजेश पाटील यांना तुम्ही आमदार करा, आम्ही त्यांना राज्यमंत्री करतो. उपस्थित जनसमुदायाच्या साक्षीने व राजेश पाटील यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे नक्कीच 50 हजारांच्या मताधिक्याने ते विजयी होतील आणि यापेक्षा दुप्पट, तिप्पट निधी आणतील, अशी खात्री आहे. महायुतीच्या अनेक योजनांमुळे महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे. त्यांच्याकडे प्रचाराचा मुद्दाच राहिला नाही.
यावेळी आ. राजेश पाटील, शिवानंद हुंबरवाडी, सुभाष देसाई, खा. धनंजय महाडिक, प्रकाश पताडे, डॉ. नामदेव निट्टूरकर, अॅड. हेमंत कोलेकर, प्रकाश चव्हाण, माजी खा. संजय मंडलिक आदींनी राजेश पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्नशील असल्याची भाषणे केली. एकाचवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चंदगड शहरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने दिवसभरात रंगीबेरंगी झेंडे, डोक्यावर टोप्या, बॅनर्स, पताकांनी आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते. आ. राजेश पाटील यांनी उत्स्फूर्तपणे शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रवादी, भाजप, शिंदे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.