Rajesh Latkar | भ्रष्टाचार तुम्ही करणार; खापर दुसऱ्यावर कशासाठी?

नाट्यगृहासमोर चर्चेला या; आ. क्षीरसागर यांना आव्हान
कोल्हापूर : पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवताना राजेश लाटकर. सोबत इंद्रजित बोंद्रे, भारती पोवार, सुनील मोदी आदी.
कोल्हापूर : पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवताना राजेश लाटकर. सोबत इंद्रजित बोंद्रे, भारती पोवार, सुनील मोदी आदी.
Published on
Updated on

कोल्हापूर : भ्रष्टाचार, टक्केवारीच्या व्हायरल कथित व्हिडीओतील आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप करू नयेत. काळी कृत्ये, भ्रष्टाचार, दादागिरी आणि मग्रुरी तुम्ही करायची आणि त्याचे खापर आ. पाटील यांच्यावर फोडायचे, हे काँग्रेस सहन करणार नाही. व्हायरल व्हिडीओ खरा की खोटा, यावर केशवराव भोसले नाट्यगृहासमोर चर्चेला या, असे खुले आव्हान महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी आ. क्षीरसागर यांना दिले. रविवारी शहर काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लाटकर म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या वर्तनात, कृतीत विसंगती दिसली की, नागरिक त्याचे व्हिडीओ व्हायरल करतात. आ. क्षीरसागर यांचेच व्हिडीओ वारंवार बाहेर का येतात, याचे आत्मपरीक्षण करा. कथित व्हिडीओमध्ये स्वतः आ. क्षीरसागर टक्केवारीचा उल्लेख करताना दिसत आहेत. विरोधी पक्ष म्हणून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आम्ही आवाज उठवणारच. वरिष्ठांच्या सहानुभूतीसाठी किंवा भ्रष्टाचार झाकण्यासाठी आ. सतेज पाटील यांच्यावर बोलू नये. लाटकर म्हणाले, केशवराव भोसले नाट्यगृह दुरुस्तीचे सुमारे २५ कोटींचे काम सुरू आहे. व्हिडीओमध्ये याच कामातील टक्केवारीचा उल्लेख आहे. हा निधी जनतेचा असल्याने यावर खुली चर्चा होणे आवश्यक आहे.

आ. क्षीरसागर यांच्या अशा व्हिडीओंची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करावी. काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे म्हणाले, हा व्हिडीओ एआयवरचा आहे. मग, संबंधितांकडून माफीनामा का लिहून घेतला? माजी नगरसेविका भारती पोवार म्हणाल्या, काँग्रेस दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत नाही. न्यायालयीन चौकशीला सामोरे जा, अन्यथा आमदारकीचा राजीनामा द्या. पत्रकार परिषदेला शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण केसरकर, नगरसेवक राहुल माने, अर्जुन माने, विनायक फाळके, अमर समर्थ, सुभाष बुचडे, संपत चव्हाण उपस्थित होते.

होय, व्हिडीओ आम्हीच व्हायरल केला : सुनील मोदी

नगरसेवक सुनील मोदी म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी कथित व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला महाविकास आघाडी निवेदन देऊन कारवाई व अटकेची मागणी करणार आहे. तसेच विधानसभा अधिवेशनात या विषयावर स्थगन प्रस्तावही मांडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news