

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेकडून राज्य शासनाला सादर झाला आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर हद्दवाढीसाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. काही महिन्यांपूर्वी मंत्रालयात हद्दवाढीवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. त्यानंतर आ. क्षीरसागर यांनी महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना त्यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने शहर परिसरातील भौगोलिक संलग्नता असलेल्या आठ गावांची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मागविली होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी संबंधित आठ गावांना नोटिसा देऊन त्यांचे लेखी म्हणणे मागविले. त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल कार्तिकेयन यांनी महापालिकेला दिला. त्यानंतर महापालिकेने शहराच्या हद्दवाढीबाबतचा सविस्तर अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. त्यामुळे हद्दवाढीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, आ.चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूर विकास प्राधिकरणाला निधी मिळण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी केली होती. मंत्री उदय सामंत यांनी त्याचा हद्दवाढीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.