कोल्हापूर ः कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पहिल्यापासून महायुतीसाठी चांगल्या घटना घडत गेल्या. पॉझिटिव्ह संकेत मिळत केल्याने विजयाची खात्री आहे, असा विश्वास महायुतीचे उमदेवार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीच ही निवडणूक पार करून नेतील, असे सांगून क्षीरसागर म्हणाले, राज्यात लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. हे कल्याणकारी योजनांचे राज्य असून सरकारने महिला, ज्येष्ठ नागरिक, युवावर्ग, शेतकरी, उद्योजक अशा सर्वच घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात चांगले काम करत आहेत. या सर्व बाबी महायुतीला पुन्हा सत्तेवर बसवतील. राज्यातील मतदार महायुतीला साथ देतील, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आपले घनिष्ठ संबंध आहेत. त्या जोरावर कोल्हापूर शहरातील विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने त्यांनी खोटे आरोप करायला सुरुवात केली. विकासकामांवर न बोलता विरोधकांकडून खोटा नॅरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु मतदार विरोधकांच्या या खेळीला भीक घालणार नाहीत, असा टोलाही क्षीरसागर यांनी लगावला.