

कोल्हापूर : राजू शेट्टी आणि त्यांच्या दहा बिनडोक्यांच्या बगलबच्यांनी माझ्यावर दहा आरोप केले, तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही. शेट्टी काय आहेत, हे शेतकर्यांना कळल्याने त्यांना लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखविली आहे. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केली. विधानसभा निवडणुकीत एका मोठ्या नेत्याची घंटी वाजवली आहे. त्याची पुनरावृत्ती आगामी महापालिका निवडणुकीत करू, असेही ते म्हणाले.
शक्तिपीठाला समर्थन करण्यामागे माझा हेतू स्वच्छ असल्याचे सांगत आ. क्षीरसागर म्हणाले, शेट्टी यांनी आजपर्यंत केवळ लोकांची डोकी भडकवण्याचे काम केले आहे. विकासाचा त्रिकोण साधत कोल्हापूरचाही विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्ग जिल्ह्यातून नेण्याचे नियोजित केले आहे. मात्र, महाविकास आघाडी लोकांत गैरसमज पसरवत आहे. ‘शक्तिपीठ’बाबत असणारे त्यांचे सर्व अक्षेप शासनाने खोडून काढले आहेत.
माझा बावडा म्हणणार्यांवर आता विचार करण्याची वेळ आली आहे, असे सांगत आ. क्षीरसागर म्हणाले, तुम्ही बावड्यासाठी केलं काय? शेतकर्यांच्या पाणंदीही करू शकला नाहीत. केवळ स्वत:च्या संस्थांचा विकास करणार्यांनी पालकमंत्री, गृहमंत्रिपद असताना काय केले? पोलिस आयुक्तालय झाले नाही. थेट पाईपलाईनही आम्ही आमरण उपोषणाला बसलो म्हणून आल्याचेही सांगत आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली.